म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : अंधश्रद्धेचे अजून किती बळी जाणार?

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : अंधश्रद्धेचे अजून किती बळी जाणार?
Published on
Updated on

सांगली; गणेश कांबळे : मिरज तालुक्यातील म्हैसाळ हे गाव काही वर्षांपूर्वी स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाने गाजले होते. आता पुन्हा हे गाव चर्चेत आले. रविवारी रात्री गावात वनमोरे कुटुंबातील नऊजणांनी एकाचवेळी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सावकारीतून हा प्रकार घडल्याचे समोर येत असले तरी दुसर्‍या बाजूला गुप्तधन, अंधश्रद्धा, मांत्रिकगिरी असल्याचे समोर येत आहे. पोलिसांचा तपास या दिशेनेही सुरू आहे. अंधश्रद्धेला केवळ अशिक्षित लोकच बळी पडतात, असे नाही तर शिक्षित लोकही मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

म्हैसाळमधील या प्रकारानंतर दिल्लीत बुराडी येथे घडलेल्या घटनेची आठवण येते. 1 जुलै 2018 रोजी भाटिया या सुशिक्षित कुटुंबातील 11 सदस्यांनी एकाचवेळी गळफासाने आत्महत्या केली होती. पोलिसांनी अगोदर खुनाचा संशय घेत तपास केला. मात्र, पोलिसांनी याचे मानसशास्त्रीय विश्‍लेषण पद्धतीने तपास केल्यानंतर यामागे अंधश्रद्धा असल्याचे उघड झाले. मृत व्यक्‍तीशी संवाद साधणे आणि त्याच्या संदेशावर, हुकूमाबरहुकूम कृती करीत आत्महत्या केल्याचे शेवटी उघड झाले. मृत व्यक्‍तीशी संपर्क साधणे हा एक मानसिक आजार आहे.

म्हैसाळ प्रकरणामध्येही 9 जणांनी एकाचवेळी आत्महत्या केली असली तरी यामागे कुटुंबीयांना आत्महत्या करण्यासाठी 'सूचना' देणारा एखादा मांत्रिक तरी नाही ना या बाजूने तपास गरजेचा आहे.

गुप्तधनापोटी मुले, प्राण्यांचे बळी

नागाच्या डोक्यावर नागमणी असतो आणि तो मिळविण्यासाठी कोट्यवधी खर्च करणारे भेटतील. तो मणी जवळ असेल त्याला गुप्तधन मिळेल, अशा अफवा पसरवणारे सर्वत्र आढळतात. अंधश्रद्धेपोटी कासवाची तस्करी हा प्रकार सर्रास होत आहे. कासव गुप्तधन शोधून देते अशी अंधश्रद्धा आहे. कासवाचे मांस खाल्ल्याने लैंगिक इच्छा बळावते, असाही गैरसमज आहे. म्हांडूळचाही बळी दिला जातो. काहीवेळेस गुप्तधनासाठी लहान मुलांचे बळीही दिल्याच्या घटना आहेत.

पैशाचा पाऊस : लाखोंची फसवणूक, मुलीवर बलात्कार

पैशाचा पाऊस पाडतो, असे सांगून एका मांत्रिकाने 15 लाखांची फसवणूक केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली. मुंबईमध्ये एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. कोल्हापूर जिल्ह्यातही असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. लोकांच्या घरात पैशाचा पाऊस पडत नसला तरी मांत्रिक व मध्यस्थांच्या घरात मात्र पैसाच पैसा येत असल्याचे दिसून येते.

नारायण नागबळीचे वाढते प्रस्थ

एखाद्याचा अपघातात मृत्यू होणे, आत्महत्या केल्याने मृत्यू होणे, घरातून निघून जाणे, संतती न होता मरण पावणे, धनलोभात मृत्यू पावणे अशा कारणामुळे व्यक्‍तीच्या पत्रिकेत पितृदोष तयार होतात, त्याच्या निवारणार्थ नारायण नागबळी विधी करावा अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्यात आली आहे. या प्रकारामध्ये नेते, मंत्री, उद्योगपती आणि शिक्षितांचा मोठा भरणा असल्याचे दिसून येते. हा विधी करण्यासाठी सोन्याचा नाग विधीमध्ये दान देण्याची प्रथा आहे.

हा विधी केल्यानंतर पितृदोष निवारण होऊन सुखसमृद्धी येईल, असे सांगण्यात येते. अंधश्रद्धेपोटी कधी पैशाचे, तर कधी स्त्रियांचे शोषण केले जाते. जादूटोणाविरोधी कायदा होऊनही त्याची अद्याप ठोस अंमलबजावणी न केल्याने बुवा-मांत्रिक लोकांना फसविण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांनी या कायद्याची ठोस अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

जादूटोणाविरोधी कायदा काय म्हणतो…

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्वत:चा जीव दिला. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 या नावाने हा कायदा आहे. यामध्ये पुढील कलमे आहेत. 1) भूत उतरविण्याच्या बहाण्याने व्यक्‍तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेवणे, मारहाण करणे, छताला टांगणे, चटके देणे, अमानुष कृत्य करणे, 2) तथाकथित चमत्कारातून आर्थिक प्राप्ती होईल, असे सांगून फसवणूक करणे, दहशत पसरवणे, 3) करणी, भानामती, जादूटोण्याची भीती दाखवून अमानुष कृत्य करणे व नरबळी देणे, 4) अतिंद्रिय शक्‍तीचा शरीरातील संचाराचा दावा करून भीती, धमकी व फसवणूक करणे, 5) विशिष्ट व्यक्‍तीवर करणी, जादूटोण्याचा आरोप करून वा त्याला सैतान ठरवून त्याचे – तिचे जगणे मुश्किल करणे, 6) चेटूक केल्याचा आरोप करून मारहाण करणे व समाजातून बाहेर काढणे, 7) मंत्र-तंत्राद्वारे भूत पिशाच्चांना आवाहन केल्याचा आभास निर्माण करून घबराट व अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे, 8) साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करून मंत्र-तंत्र, गंडे-दोरे यांचा अवलंब करणे, 9) रक्‍तविरहीत शस्त्रक्रियेचा आभास निर्माण करून लिंग बदलाचा वा इतर उपचाराचा दावा करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news