पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कमाल तापमानाचा पारा 0.5 ते 2 अंशांनी कमी झाला असला, तरीही आर्द्रता 60 ते 75 टक्क्यांवर गेल्यामुळे राज्यात उकाडा जाणवत आहे. उष्ण वारा ढगांमुळे शहरातच कोंडला जातोय, त्यामुळे सर्व राज्यात भयंकर उष्मा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. मराठवाडा आणि लगतच्या पश्चिम विदर्भावरील चक्रीय स्थिती विरून गेली आहे. मंगळवारी विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
कोकणात कोरडे वातावरण होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 25 एप्रिल; तर विदर्भात 28 एप्रिलपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वार्यांचा प्रभाव अजूनही आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात ढग आहेत. तसेच, आर्द्रता वाढली आहे. उन्हाळ्यात आर्द्रता 40 ते 50 टक्के असते. मात्र, यंदा ही आर्द्रता 60 ते 75 टक्क्यांवर गेल्याने उष्मा वाढला आहे. त्यामुळे असह्य करणारा उकाडा तयार झाला आहे.
वाशिम 42.2, मुंबई 33, पुणे 39, अहमदनगर 39.8, जळगाव 36.7, कोल्हापूर 36.6, महाबळेश्वर 31.5, मालेगाव 39.6, नाशिक 35.9, सांगली 37.6, सातारा 38.6, सोलापूर 40.2, छत्रपती संभाजीनगर 38.2, नांदेड 40.2, अकोला 36.9, अमरावती 33, बुलडाणा 38, चंद्रपूर 40.2, गोंदिया 26.8, नागपूर 33, वर्धा 35.5, यवतमाळ 38.5.
विदर्भात पावसामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूर 33, गोंंदिया 26 अंशांच्या खाली आले आहे. पारा मध्य महाराष्ट्रात वाढला आहे. तेथे बाष्पयुक्त वाऱ्यांनी आर्द्रता वाढली आहे. तापमानही सरासरी 38 ते 39 अंशांवर आहेच. त्यामुळे दिवसभराची उष्णता कोंडली जात आहे. ती बाहेर पडण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली असली, तरीही एकूण उष्मा जास्त आहे.
– डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे
हेही वाचा