कच्ची केळी वजन घटवण्यासाठीही उपयुक्त | पुढारी

कच्ची केळी वजन घटवण्यासाठीही उपयुक्त

नवी दिल्ली : पिकलेली केळी अनेक जण आवडीने खातात; पण कच्च्या केळीचे गुण माहीत असणारे फार कमी लोक असतात. जीवनसत्त्व सी, बी 6, फायबर आणि झिंकसारख्या अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध असल्याने ते आपल्या आरोग्यास एक किंवा दोन नव्हे, तर अनेक आश्चर्यकारक फायदे देऊ शकते. वजन घटवण्यासाठीही कच्च्या केळाचे सेवन उपयुक्त ठरते, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे.

कच्च्या केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते तुमचे पोट बराच काळ भरलेले ठेवते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. तसेच बराच वेळ पोट भरल्यामुळे अस्वास्थ्यकर खाण्यापासून तुम्ही दूर राहता. म्हणजेच अनेक प्रकारे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अतिसाराची समस्या अधिक दिसून येते. अशावेळी कच्च्या केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. उलट्या, थकवा, मळमळ आणि डोकेदुखी कमी करण्यासाठीदेखील हे खूप प्रभावी मानले गेले आहे.

कच्च्या केळीपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात आणि त्यांच्या सेवनाने पचनसंस्थाही चांगली राहते. अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्याचा आपल्या आहारात समावेश करता येऊ शकतो. यामुळे अन्नही लवकर पचण्यास सुरुवात होईल आणि पोटात जडपणा जाणवणार नाही. कच्ची केळी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही लाभदायक ठरू शकतात. कमी ग्लाईसेमिक इंडेक्समुळे इन्सुलिन संप्रेरक हळूहळू बाहेर पडते, ज्यामुळे साखर नियंत्रित होण्यास मदत होते. कच्च्या केळीमध्ये जीवनसत्त्व सी, ई, बी 6 आणि के भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन शरीराला अनेक एंजाइमेटिक प्रक्रियांमध्ये मदत करते, जे चयापचयदेखील वाढवते. अशावेळी पोट फुगण्याची समस्याही दूर होते आणि अन्न लवकर पचते.

Back to top button