पुणे

काच आहे; पण बघायचे काय; व्हिस्टाडोम कोचमधील प्रवाशांचा हिरमोड

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे प्रशासनाने डेक्कन रेल्वेला व्हिस्टाडोम पर्यटन डबे जोडले आहेत. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबईहून पुण्याला येताना इंजिनला लागून डबा जोडला जात असल्याने प्रवाशांना या कोचमधून निसर्गरम्य दृश्य पाहताना अडथळे येत आहेत.
पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाताना सकाळी धावणार्‍या डेक्कन क्वीनला व्हिस्टाडोम कोच शेवटी असतो.

त्यामुळे निसर्गसौंदर्य न्याहाळता येते. मुंबईहून पुण्याकडे परतताना हा कोच इंजिनामागे दुसर्‍या क्रमांकाला जोडलेला असतो. मागील डबा आणि इंजिनच्या अडथळ्यामुळे निसर्गसौंदर्य पाहता येत नाही. रविवारी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने या व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला. त्या वेळी ही बाब समोर आली. डब्यातील अनेक प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोच शेवटी बसवायला हवा, असे मत व्यक्त केले.

50 हजार जणांचा प्रवास

व्हिस्टाडोम कोचद्वारे ऑक्टोबर 2021 ते 23 मे 2022 या कालावधीत 49 हजार 896 प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे रेल्वेला 6.44 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यात सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमधील व्हिस्टाडोम कोचमध्ये 18 हजार 693 प्रवाशांनी प्रवास केला असून, त्याद्वारे 3.70 कोटी महसूल मिळाला आहे. सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीनने पुणे ते मुंबई या मार्गावर एकूण महसुलाच्या 99 टक्के महसूल मिळविला आहे.

मुंबईहून पुण्याला येताना व्हिस्टाडोम कोच काढून मागे लावताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे कोच काढून मागे लावेपर्यंत खूप वेळ वाया जात आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला लावण्यात येणारा हा कोच पुण्यात येताना दुसर्‍या क्रमांकावर असतो.

                           – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT