पुणे

एक्साइजचा अवैध दारू धंदेवाल्यांना दणका; सव्वा महिन्यात दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाने देखील कंबर कसली असून, अवैध दारूधंद्यांवर 16 मार्च ते 22 एप्रिल या सव्वा महिन्याच्या कालावधीत मोठी कारवाई करीत 441 गुन्हे दाखल केले. तसेच 325 संशयितांना अटक केली. यामध्ये 53 वाहनांसह एक कोटी 53 लाख 8 हजार 805 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे अवैध दारूधंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

पुणे जिल्ह्यात शिरूर, मावळ, बारामती आणि पुणे शहर असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून एक्साइजने अवैध दारूधंदे चालविणार्‍यांना दणका दिला आहे. निवडणूक काळात अवैध दारू वाहतूक, साठा तसेच विक्री व निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक्साइजकडून खबरदारी घेत रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. त्यासाठी 14 नियमित व तीन विशेष भरारी पथके नियुक्त केली आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणार्‍या मद्यसाठ्यांवर छापे मारण्यात येत आहेत.

चौघांकडून घेतले बंधपत्र

महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराइतांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले. आचारसंहिता लागल्यापासून 13 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत असे चार सराइतांकडून बंधपत्र घेण्यात आले. यात बंधपत्राची एक लाख पाच हजार रुपयांची रक्कम आकारण्यात आली.

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री करणार्‍यांवर एक्साइजच्या पथकांचा वॉच आहे. असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी माहिती द्यावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल.

– चरणसिंग राजपूत, अधीक्षक, एक्साइज, पुणे

तीन परवाने निलंबित

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवानाधारक मद्यविक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. यात बिअर/वाइन शॉपी व परवानाधारक मद्य विक्रेत्यांचे तीन परवाने रद्द करण्यात आले. तसेच नियमभंगप्रकरणी 77 अनुज्ञप्तीधारकांवर कारवाया केल्या. फ

आचारसंहितेपासून दाखल गुन्हे

  • गुन्हे – 441
  • अटक संशयित – 325
  • जप्त वाहने – 53
  • जप्त मुद्देमाल – 1,53,08,805

सव्वा महिन्यात जप्त मद्य

(लिटरमध्ये)

  • हातभट्टी – 15846.8
  • देशी दारू – 755.53
  • विदेशी मद्य – 629.7
  • बिअर – 804.89
  • ताडी – 3954

हेही वाचा

SCROLL FOR NEXT