पुणे, पुढारी वृत्तसेवा: वार्याचा वाढलेला वेग आणि हवेचा वाढलेला दाब, टेकड्यांवरील झाडांची संख्या कमी झाल्याने शहरात मान्सूनपूर्व पाऊस कमी पडू लागला आहे. यंदा तर पूर्ण हंगामात केवळ एकच दिवस पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. पुणे शहर आणि परिसरात मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत किमान मान्सूनपूर्व पाऊस चांगलीच हजेरी लावत असतो.
मात्र, मागील दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पाऊस हळूहळू कमी होत गेला असल्याचे दिसून आले आहे. या वर्षी तर केवळ एकच दिवस पाऊस पडला आहे. तोही एक ते दीड तास. मात्र, या कालावधीत 28 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याबाबत हवामानाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले,'पुण्यातच नाही, तर राज्यात यंदा हवेचा दाब एक हजार सहा हेक्टापास्कलपेक्षा जास्त राहिला.
त्यामुळे त्याचा परिणाम राज्याबरोबरच पुणे शहरातील हवामानावर झाला. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यातच पुणे शहर आणि आसपासच्या भागात असलेल्या टेकड्यांवरील झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस यंदा झालाच नाही. आता मात्र टेकड्यांवर कमी पाण्यावर उगवणारी झाडे लावण्याची गरज आहे.
हवामानाचे संतुलन राखणे तेवढेच गरजेचे आहे. तरच उन्हाळ्याच्या दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस पुन्हा वाढेल.' हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, 'यंदा राज्याच्या सर्वच भागांत मान्सूनपूर्व पाऊस पडण्यासाठी योग्य स्थिती तयार झाली नव्हती. त्यामुळे शहरासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.'
हेही वाचा