पुणे

उजनी धरणावर किलबिलाट : देश-विदेशातील शेकडो पक्षांचा मुक्काम

Laxman Dhenge

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उजनी (यशवंत जलाशय) धरणाच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात आकाशातून उडताना जणू काही पंखातून लाल-गुलाबी रंगाची उधळण करीत निघालेले फ्लेमिंगो पक्षी (रोहित) हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहेत. तसेच, देश-विदेशातील दीडशेपेक्षा अधिक प्रजातीच्या पक्ष्यांनी उजनीच्या वैभवात भर घातली आहे. त्यामुळे या पक्ष्यांचा अधिवास व जीवन पक्षिप्रेमींना अतिशय जवळून पाहता येत आहे. या ठिकाणी पर्यटकांसह पक्षिप्रेमींची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

फ्लेमिंगोसह ग्रे हेरॉन, स्पून बिल, पेटंट स्टार्क, ओपन बिल स्टार्क, नाइट हेरोन अशा शेकडो प्रजातीच्या पक्ष्यांनी उजनी धरणावर सध्या गर्दी केल्याचे दिसत आहे. धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून, उथळ ठिकाणी पक्ष्यांना मुबलक प्रमाणात लहान मासे, झिंगे, किडे, गवत, शंख, शिंपले असे खाद्य उपलब्ध होत आहे. हे पक्षी पावसाळा सुरू होईपर्यंत येथेच मुक्काम करतात. या पक्ष्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी व अभ्यासासाठी अनेक जण राज्याच्या कानाकोपर्‍यातून उजनी धरणावर येत आहेत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत पर्यटकांची संख्या कमी- अधिक प्रमाणात असते. मात्र, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे. अनेक जण मुक्कामी राहत आहेत. पहाटेच्या वेळी होडीतून पक्ष्यांचे वास्तव्य असलेल्य ठिकाणी ते जात आहेत. त्यांची छायाचित्रे कॅमेर्‍यात कैद केली जात आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT