अखेर पुणे बाजार समितीचा तपासणी अधिकारीच बदलला..! | पुढारी

अखेर पुणे बाजार समितीचा तपासणी अधिकारीच बदलला..!

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी तत्कालीन पणन सहसंचालक दीपक शिंदे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करीत 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालीन पणन संचालकांनी दिले. त्यानुसार आजअखेर म्हणजे जवळपास सहा महिने होऊनही तपासणी अहवाल दाखल झालेला नसून पणनच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आणि आपली बदली झाल्याचे कारण पुढे करीत शिंदे यांनी या तपासणीतून सुटका करून घेतली आहे.

विद्यमान पणन संचालक विकास तपास रसाळ यांनी या तपासप्रश्नी शिंदे यांना कोणतीही कारणे दाखवा नोटीसही न बजावता त्यांची विनंती मान्य करीत दुसर्‍या अधिकार्‍यावर तपासणीची जबाबदारी सोपविल्याने त्यांनी शिंदे यांना अभयच दिल्याची बोचरी टीका अधिकार्‍यांमधून सुरू झाली आहे. यातून पणन संचालनालयातील अधिकार्‍यांमधील शह-काटशहाचे शीतयुद्ध पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. त्यातून बाजार समित्यांवर कार्यालयाचा धाकच राहिलेला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, तत्कालीन पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी पुणे बाजार समितीच्या दिनांक 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीतील कामकाजाची तपासणी करण्यासाठी शिंदे यांच्यावर तपासणीची जबाबदारी सोपविली. तसे आदेश त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी देत पंधरवड्यात अहवाल सादर करावेत, असे म्हटले. मात्र, आजअखेर ही तपासणी पूर्ण झालेली नसून पणन संचालकांच्या आदेशाला अक्षरश: वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. दरम्यान, तपासणी अहवालच तयार झालेला नसल्याची माहिती गुरुवारी (दि.18) पणन संचालक विकास रसाळ यांनीच दिली. आता शिंदे यांच्याऐवजी दुसरे पणन सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांच्यावर तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे ते म्हणाले.

एक बदली रद्द करून तिसर्‍या ठिकाणी रुजू

पुण्यातील राज्य कृषी पणन मंडळात सरव्यवस्थापक आणि मॅग्नेट प्रकल्पाची संयुक्त जबाबदारी सांभाळणारेे दीपक शिंदे यांची शासनाने सहकारचे विभागीय सहनिबंधक म्हणून लातूर येथे बदली केली. ही बदली शिंदे यांनी आपले सर्वतोपरी ‘वजन’ वापरून मंत्रालयातून रद्द करीत पुण्यातच पणन सहसंचालकपदी वर्णी लावून घेतली. आता पणन संचालक कार्यालयातून ते पुन्हा वखार महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून पूर्णवेळ रुजू झालेले आहेत.

विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी वखार महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले होते. आता बदलीचे कारण पुढे करून शिंदे यांनी पुणे बाजार समितीच्या तपासणीमधून स्वतःची सुटका करून घेतली आणि पणन संचालनालयाने त्यांना अहवाल दाखल न झाल्याबद्दल साधी नोटीसही न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button