पुणे

ई-वाहनांसाठी चार्जिंग व्यवस्था केल्यास सवलत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पर्यावरणपूरक ई-वाहने वापण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी इमारतीच्या पार्किंगमध्ये ई-वाहनांसाठी चार्जिंगची व्यवस्था करणार्‍या सोसायट्यांना मिळकत करात सवलत देण्यासोबतच इतर सवलती देण्याचा विचार केला जात आहे. सवलतीच्या पर्यायांची 'ईव्ही सेल'च्या बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह वाहन कंपन्यांचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे प्रतिनिधी, पीएमपीएमएल, मेट्रो, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, एमआयडीसी व संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधी 'ईव्ही सेल'च्या बैठकीला उपस्थित होते.

ई-वाहन घेणार्‍यांना मालमत्ता कर सवलत, इमारतींमध्ये आरक्षित जागा, रस्त्यांवरील पार्किंगला प्राधान्य आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय जनजागृती मोहीम याविषयीही चर्चा करण्यात आली. याशिवाय पीएमपीएमएल आणि पुणे मेट्रो यांनी एकत्रित काम करून नागरिकांना पहिल्या थांब्यापासून ते शेवटच्या थांब्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासंबंधीही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सर्व नवीन निवासी इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या तरतुदीसाठी अतिरिक्त वीज भार अनिवार्य करण्यावर ईव्ही सेलने एकमत केले. सोसायट्यांमध्ये चार्जिंगसाठी स्वतंत्र मीटर बसवणे या मुद्द्यावर चर्चा झाली. याशिवाय मॉल्स, सिनेमा हॉल, रुग्णालये, विद्यापीठे, महाविद्यालये आदी नवीन आणि विद्यमान व्यावसायिक इमारतींमध्ये ई-वाहनांसाठी काही टक्के पार्किंग स्थाने आरक्षित करण्यावरही चर्चा झाली.

ईव्ही सेलच्या बैठकीत सर्व संबंधित घटक सहभागी झाले होते. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास होणार्‍या आर्थिक व पर्यावरणीय फायद्यांची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी लवकरच शहरात जनजागृती अभियान राबवले जाईल.

                         – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT