पुणे

आत्मनिर्भर भारतासाठी नवकल्पना आवश्यक; भारत फोर्जचे अध्यक्ष कल्याणी यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

पुणे : 'देशाचे उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनण्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम नवकल्पना आवश्यक आहे,' असे भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी स्पष्ट केले. बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त त्यांच्याशी मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीत पत्रकारांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

'उदयोग क्षेत्रात आज तंत्रज्ञान सक्षम स्टार्टअपचे प्रमाण वाढत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत आज देशातील अंदाजे 68 यूनिकॉर्न्सनी 25 लाख कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे. त्यांना प्रोत्साहन, पाठबळ मिळावे यासाठी पंतप्रधान मोदींनी अनेक उद्योग स्नेही धोरणे राबवली आहेत. आजमितीला भारतात येणार्‍या स्टार्टअप कंपन्या या फिनटेक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पण आगामी काळ हा प्रामुख्याने डीपटेक तंत्रज्ञानाचा असणार आहे.

यात क्वान्टम कम्युटिंग, ड्रोन, एआयचा समावेश असणार आहे,' असे ते म्हणाले. आर्टलरी गन हे संरक्षणाचे महत्त्वाचे आयुध असून टँक्स, रॉकेटसह आर्टीलरी गनचे उत्पादन करण्यास आम्ही पुढाकार घेतला आहे. यासाठी जगातील सर्वात आधुनिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे संपूर्ण भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची आणि साहित्याची निर्मिती आम्ही करीत आहोत. देशाला या क्षेत्रात आत्मनिर्भरतेची गरज असल्याचा कल्याणी यांनी पुनरुच्चार केला.

'जागतिक पातळीवर शस्त्रास्त्र निर्यातीतही भारत पुढील दशकभरात चांगली कामगिरी करेल,' असे सांगताना बाबा कल्याणी म्हणाले की, पुढील काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही अधिक सक्षम असणार आहे. जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था 7 ते 8 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.याच काळात शस्त्रास्त्र निर्यातीतही भारताचा वाटा मोठा असेल. 'भारताच्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न आवाक्यात आहे.

मात्र भारतीय उद्योगांना पर्यावरणातील बदल आणि उत्पादित वस्तूंचा पूर्नवापर (सेक्यूलर इकोनॉमी) करण्याच्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. सध्या सगळीकडे उर्जेचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.परिणामी, कार्बन उर्जनामुळे पर्यावरण संतुलनात बिघाड होत आहे. त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. अशावेळी नवीकरणीय उर्जेचा अधिकाधिक वापर फायदेशीर ठरणार आहे,' असेही ते म्हणाले.

'भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथे गाईं, म्हशींची लोकसंख्याही मुबलक आहे.त्यांच्या शेणाचा वापर करुन मिथेन निर्मिती करणे शक्य आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन शेणाचा पूर्नवापर करण्यावर भर दिला पाहिजे,' असेही ते म्हणाले. 'ईलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या क्षेत्रात भारत फोर्ज कंपनी भरीव काम करत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक, हायड्रो इंजिन उत्पादनासाठी येथे मोठ्या प्रमाणात काम केले जाते.

पुढील 30 वर्षांच्या कालावधीत कार्बन उत्सर्जित करणाऱे आयसीए इंजिन्स बाद होतील, असे सुतोवाच बाबा कल्याणी यांनी केले. पर्यायी इंधन क्षेत्रात तीन चाकीसह इलेकि्र्ट ट्रक लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. त्यासाठी पुण्यातील स्टार्टअप कंपनीसोबत करार केला आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान भारतात आणण्याठी भारत फोार्जने अमेरिकेत दोन टेक सेंटर्स उभे केले आहेत,' असे त्यांनी सांगितले.

पुण्यभूषण पुरस्कार मिळणे ही पुण्याईच

पुण्यात शैक्षणिक, तंत्रज्ञान, सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर बुद्धिमानी लोकांची फळी कायम सज्ज असते. इथली लोकं बौद्धिक संपन्न असून उद्योगांचा विचार करतात. ही पुण्याची परंपरा ब्रिटिशांच्या काळापासून आहे. याचा दाखला देताना 1881 सालच्या न्यू इंग्लिश स्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक कुंटे यांनी आपल्या भाषणात भारतीयांना लोहारकाम शिकण्याचा सल्ला दिला होता. कारण त्या वेळी ब्रिटिशांच्या हातात बंदुका होत्या, तर भारतीयांच्या हातात निव्वळ तलवारी होत्या. त्यामुळे अशा सर्वसंपन्न पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार मिळणे, ही माझी पुण्याईच आहे.

                             – बाबा कल्याणी, सीएमडी, भारत फोर्ज

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT