पुणे

अहो, स्वस्ताई फक्त उरली भाषणातच

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'स्वस्ताई ही फक्त भाषणातूनच दिसते. दुकानात जा किंवा बाजारात, सर्व जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. दररोजच्या खाद्यपदार्थांत वापरल्या जाणार्‍या वस्तू एवढ्या महागल्या आहेत की पैसाच शिल्लक राहत नाही. त्याला असलेले पर्यायही महागच असल्याने रोजचे जगणेच अवघड झाले,' सांगत होत्या, सायली तिकोणे…

धनकवडी परिसरात राहणार्‍या तिकोणे यांचे अवघ्या चार जणांचे कुटुंब. गृहिणी असलेल्या त्यांना दोन मुली आहेत, तर त्यांचे पती पेपरसंबंधी दुकान चालवतात. कोरोनाकाळात सर्व काही बंद असताना शिल्लक असलेल्या पैशांतून संसार सावरला. त्यानंतर सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले खरे; मात्र महागाईने डोके वर काढले. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. खाद्यतेल, डाळी, कांदा, टोमॅटो या स्वयंपाकगृहातील महत्त्वाच्या वस्तू त्या कमीही करता येत नाहीत.

त्यामुळे त्यांच्यावर पैसा खर्च करण्याशिवाय पर्यायच राहिला नसल्याचे त्या सांगतात. दरम्यानच्या काळात महागाईतून दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने सुरुवातीला खाद्यतेलांच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ कृषी करही कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा किरकोळ बाजारात काहीच परिणाम झाला नाही. याखेरीज इंधनदरात कपात केली. त्याचाही काही परिणाम दिसून आला नाही.

महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा परिणाम हा किलोमागे फक्त तीन ते पाच रुपयांनी वस्तू स्वस्त होण्यास झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात किलोमागे दहा ते चाळीस रुपयांची वाढ झाली असताना तीन ते पाच रुपयांच्या स्वस्ताईने काय फरक पडणार, हाही एक प्रश्नच आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT