पुणे

अठराशे रुपये पडले महागात! लाचखोर रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रवासादरम्यान रेल्वे सवलतीचा पास हरविल्यानंतर नवीन पास देण्यासाठी अर्ज केलेल्या अपंग व्यक्तीकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी रेल्वे अधिकार्‍याने केली. केंद्रीय तपास यंत्रणने (सीबीआय) सापळा लावून अठराशे रुपयांची लाच स्वीकारताना नुकतीच कारवाई केली. या कारवाईमुळे रेल्वेतील खाबुगिरी चव्हाट्यावर आली. सुब्रतो असे कारवाई करण्यात आलेल्या रेल्वे अधिकार्‍याचे नाव आहे. यावर भ्रष्टाचाराच्या पीसी अ‍ॅक्ट 1988 (सुधारित कायदा 2018) च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका अपंग व्यक्तीने

सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांचे 2017 मध्ये रसाचे गुर्‍हाळ होते. गुर्‍हाळात काम करताना उजवा हात गुर्‍हाळात गेल्याने त्यांच्या हाताला अपंगत्व आले. नाइलाजास्तव त्यांना गुर्‍हाळाचा व्यवसाय बंद करावा लागला. नंतर ते शेतीची कामे करून उपजीविका भागवत होते. त्यांनी 2018 मध्ये रेल्वे प्रवासासाठी लागणारे सवलत प्रमाणपत्र मिळवले होते. 2023 मध्ये त्यांनी कार्डचे पुन्हा नूतनीकरण करून घेतले. मात्र, दि. 4 एप्रिल 2024 रोजी पुणे ते गुजरात असा काही कामानिमित्त प्रवास करत असताना त्यांची प्रवासाची बॅग चोरीला गेली.

त्यात त्यांची सर्व कागदपत्रे चोरीला गेली. त्याच अपंगत्वाचे प्रमाणपत्रदेखील होते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कार्यालयात अर्ज केला. मात्र, हे प्रमाणपत्र देण्यासाठी सुब्रतो हा त्यांच्याकडे दोन हजारांची लाचेची मागणी करत होता. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून 1 हजार 800 रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने सुब्रतोवर कारवाई केली. 18 एप्रिल रोजी सीबीआयने ही कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT