अविनाश दुधवडे
चाकण : युद्धात आणि रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय संस्कृतीत अभिमानाचे मानले जाते. रणांगणावर मरण आलेल्या वीरांची स्मारके वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारली गेली आहेत. अशीच काही वीरगळ पुणे-नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकाच्या लगतच्या भागात आजही पाहावयास मिळतात. परंतु याकडे स्थानिकांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
चाकणमध्ये काही ठिकाणी आजही असे वीरगळ कित्येक वर्षे ऊन, वारा अन् पावसाचा सामना करत आपले अस्तित्व टिकवून आहेत. खेड तालुक्यातील राजगुरुनगर, वरुडे आदी भागातसुद्धा अनेक ठिकाणी असे वीरगळ, सतीशिळा आहेत. दुर्दैवाने याबाबत अनेकांना माहितीच नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील काही वर्षात असे वीरगळ मंदिरांच्या भागात नेऊन ठेवण्यात आले आहेत किंवा आहे त्याच ठिकाणी लहानसे बांधकाम करून वीरगळांना शेंदूर फासण्यात आला आहे.
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दगडांचा अथवा लाकडाचा स्तंभ. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. अनेक जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट कोरीव काम करून तो पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे म्हणजेच वीरगळ. वीरगळ एखाद्या गावात सापडणे म्हणजे त्या गावचा इतिहास उज्ज्वल आहे. ज्या भागात वीरगळ शिल्प आहेत, त्यावरून त्या गावचे योद्धे युद्धामध्ये प्राणपणाने लढले व अजरामर झाले, असे समजले जाते.
साधारणपणे दीड ते दोन फुटांच्या दगडावर कोरलेले वीरगळ दिसून येतात. काही वीरगळांवर वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले आहे. युद्धात मरण आलेले वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे दाखवलेले आहे. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र, सूर्य यांनी अंकित आहेत.
आकाशात चंद्र, सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहील असे यातून सूचित करायचे असावे. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित आहेत. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नाही, फक्त चित्रे कोरलेली आहेत. अनेक भागात जमिनीत हे वीरगळ पुरलेले व त्यांना शेंदूर लावलेला दिसून येतो.
मागील 60 वर्षांपासून हे वीरगळ आम्ही येथे पाहत आहोत. पुणे-नाशिक रस्त्याचे काम सुरुवातीला म्हणजे सुमारे 40 वर्षांपूर्वी सुरू झाले त्यावेळी रस्त्यात येणारे हे वीरगळ रस्त्यापासून काही अंतरावर आणून ठेवले आहेत. त्याच ठिकाणी लहान मंदिर उभारून त्याची पूजाअर्चा केली जात आहे. पुरातन देवता म्हणून पूजाअर्चा होत असलेल्या या वीरगळाबाबतचा नेमका इतिहास किंवा त्या वीरांची माहिती मात्र सांगता येणार नाही.
– तान्हाजी बागडे, वीरगळांचे देखभालकर्ते
हेही वाचा