चोरीच्या घटनेनंतर तब्बल 22 दिवसांनी विद्युत पंप चोरीचा गुन्हा | पुढारी

चोरीच्या घटनेनंतर तब्बल 22 दिवसांनी विद्युत पंप चोरीचा गुन्हा

जेऊर : पुढारी वृत्तसेवा: नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव परिसरात असलेल्या महापालिका मालकीच्या पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर साहित्य चोरीच्या घटनेनंतर तब्बल 22 दिवसांनी महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि.10) रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पिंपळगाव तलावाचे सुमारे 700 एकर क्षेत्र महापालिकेच्या नावावर आहे. मागील महिन्यात येथील वृक्षांची तोड करून वनसंपदेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. नुकसान करणार्‍यांवर 126 वृक्षांची तोड केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सांगली : शैक्षणिक शुल्कास सक्ती केल्यास कारवाई : गायकवाड

त्याच दरम्यान 19 मे रोजी तेथील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर अनेक साहित्यांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती. त्या घटनेचा पंचनामा देखील महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला होता. परंतु या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणी महापालिकेने तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुका प्रमुख गोरख आढाव यांनी केली होती.

पिंपळगाव माळवी तलाव परिसरात असलेल्या महापालिका मालकीच्या पंपिंग स्टेशन येथून काही साहित्य चोरीला गेलेले आहे. त्याची पाहणी करण्यात आली असून त्या ठिकाणी यापूर्वी काय काय होते व आता काय शिल्लक आहे, याची तपासणी केली जात आहे. नेमके कोणते साहित्य चोरीला गेले याची लिस्ट तयार करण्यात येत असून याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांपुढे ठेवण्यात आलेला आहे.

भांडगाव परिसरात वादळी वार्‍याने उडाली तारांबळ; दहा मिनिटांच्या पावसाने शेतात पाणीच पाणी

आयुक्तांची मंजुरी आणि चोरीला गेलेल्या साहित्याची लिस्ट तयार होताच पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रदीप ढगे यांनी सांगितले होते. या प्रस्तावास आयुक्तांनी गुरुवारी (दि.9) मंजुरी दिल्यानंतर अभियंता रोहिदास सातपुते यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.10) रात्री फिर्याद दिली.

तलावातील 2 वीज पंप, 2 छोटे पंप, पंपाची झाकणे, मिक्सर पंप आदी साहित्य चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button