सांगली : जिल्ह्यातून होणार 26 हजार टन साखरेची निर्यात | पुढारी

सांगली : जिल्ह्यातून होणार 26 हजार टन साखरेची निर्यात

सांगली : विवेक दाभोळे
सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांना नवीन धोरणानुसार 26 हजार 631 टन साखर निर्यात करण्याचा कोटा मंजूर झालेला आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या तात्काळ मंजुरीसाठी वन् विंडोचा लाभ न मिळणे, निर्यात मर्यादेचे बंधन याचा फटका बसलेला असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील शिल्लक साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात राहणार आहे.

एकीकडे देशातून सलग चौथ्या वर्षी साखरेची उच्चांकी निर्यात झाली आहे. अद्यापही 15 लाख टन साखरेची निर्यात होऊ शकते. मात्र 24 मे रोजी केंद्र सरकारने महागाई रोखण्यासाठीचे उपाय म्हणून साखरेच्या निर्यातीसाठी मर्यादा घातली. शंभर लाख टनापेक्षा जादा साखर निर्यात होऊ शकणार नाही, असा शासनाचा आदेश राहिला आहे. यातून देशांर्तगत बाजारात साखरेचे भाव आवाक्यात राहण्यासाठीचा हा उपाय असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, निर्यात साखरेच्या मंजुरीसाठी एक जूनपासून तीन दिवसांकरिता केंद्राने एक खिडकी योजना सुरू केली. यातून कारखान्यांनी निर्यातीसाठी मागणी करायची होती. आता सरकारने आलेल्या प्रस्तावानुसार साखर निर्यातीचा कोटा मंजूर केला आहे. साधारणपणे मागणीच्या 45 टक्केच्या घरात साखर कोटा मंजूर झाल्याचे सकृतदर्शनी तरी दिसते.

जिल्ह्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, साखराळे, दत्त इंडिया सांगली, डालमिया – निनाई आणि सद‍्गुरू श्री श्री या चार कारखान्यांनी 58 हजार 559.3 टन साखर निर्यातीची परवानगी मागितली होती. मात्र या चार कारखान्यांना मिळून 26 हजार 631 टन साखर निर्यातीस मंजुरी मिळाली आहे. या कारखान्यांनी साखर निर्यातीसाठी केलेली मागणी आणि मंजूर कोटा याची माहिती सोबतच्या चौकटीत दिली आहे.

आता किमान ऑक्टोबरपर्यंत तरी जिल्ह्यातून 26 हजार 631 टन इतकीच साखर निर्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी अन्य कारखान्यांकडे तसेच या कारखान्यांकडे मिळून जिल्ह्यात साखरेचा मोठा साठा शिल्लक राहणार आहे. शिवाय ऑक्टोबर 2022 नंतर नवीन हंगामातील उत्पादित होणार्‍या साखरेचे ओझे यात वाढणार आहे. निर्यात मर्यादेच्या बंधनामुळे कारखानदारांच्या चिंतेत भरच पडणार आहे.

निर्यात मागणी, मंजूर साखर कोटा (टन)

राजारामबापू (साखराळे) : 15511, 07109
दत्त इंडिया, सांगली : 21200, 09717
सद‍्गुरू श्री श्री : 10166, 04461
विश्‍वास : 11007.3, 05044
एकूण : 58559.3, 26631.3

Back to top button