सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर: मागील चार ते पाच वर्षांपासून निवडणुकीची वाट पाहण्याची जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुकांची शिगेला पोहचलेली उत्सुकता अखेर सोमवारी (दि. 14) काहीशी संपली. परंतु, प्रशासनाने गट-गणांच्या फेररचना करताना प्रचंड तोडफोड करीत प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे. खेड तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या चार-साडेचार वर्षांपासून रखडल्या होत्या. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण आणि राज्यातील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला. (Latest Pune News)
अखेर सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या. त्यानुसार सोमवारी पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांची प्रारूप गट-गणरचना जाहीर झाली.
यामध्ये खेड तालुक्यात पूर्वी 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण होते. या फेररचनेमध्ये एक गट व दोन गणांची संख्या वाढली. प्रशासनाने वाढलेला गट व गण तयार करताना तालुक्यातील सर्वच गट-गणांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
यामध्ये बहुतेक प्रस्थापित लोकांना धक्का देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. यात अनेक ठिकाणी भौगोलिक सलगता न राखता गावे सोयीस्करपणे या गटातून त्या गटांमध्ये टाकल्याचे दिसतेय. खेड तालुक्यात आता 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गण झाले आहेत.
यामध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, अरुण चांभारे, बाबा राक्षे, निर्मला पानसरे या सर्वांच्या पूर्वीच्या गटांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. याशिवाय तालुक्यातील प्रस्थापित व भविष्यात राजकारणात उभारी घेऊ शकतील असे बाजार समिती सभापती विजय शिंदे, आशिष यळवंडे यांना गट-गणरचना करतानाच निवडणुकीपूर्वीच
खिंडीत रोखल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही रचना करताना जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीत काम न केलेल्यांना धडा शिकवल्याचे व काही जवळच्या कार्यकर्त्यांसाठी सोयीचे गट-गण केल्याची चर्चा तालुक्यात आहे.
खेड तालुक्यातील गट- गणरचनेतील मोठे फेरबदल
वाडा-वाशेरे गट करताना पूर्वीच्या नायफड-वाशेरे या गटाचे अस्तित्व संपुष्टात आणले आहे. यामध्ये वाडा गाव जोडून मोठा फेरबदल केला आहे. रेटवडी-वाफगाव गट करताना विजय शिंदे यांना धक्का देण्यासाठी हक्काची मतदान होणारी दावडी व कनेरसर गावे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हक्काच्या मतदारसंघात पिंपळगाव तर्फे खेड-मरकळ गटात टाकली आहेत.
महाळुंगे-आंबेठाण गट करताना निघोज गाव दुसऱ्याच गटामध्ये टाकले आहे. पिंपळगाव तर्फे मरकळ गट करताना देखील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांना धक्का देऊन भविष्यात नवीन चेहर्याला संधी देण्याच्या दृष्टीने गटरचना करण्यात आल्याची चर्चा आहे.