

Soybean and pulses sowing area increases
राजगुरुनगर: जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यात मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलै महिना उजाडला तरी उसंत घेतलेली नाही. यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी खरीप पिकांची पेरणी होण्यासाठी अपेक्षित असा वाफसा झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आजअखेर राजगुरुनगर कृषी उपविभागात सरासरी 66 टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात गेल्या काही पिढ्यांमध्ये प्रथमच मे महिन्यात तो देखील सलग पाऊस सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली व खरीप हंगामापूर्वी मशागत करण्यास वेळच मिळाला नाही. भाताची रोपे टाकण्यासाठी अपेक्षित वापसा झाला नाही. याचा परिणाम भात रोपावर झाले व भात रोपवाटीका पातळ झाल्या. (Latest Pune News)
गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी 30 जुलै ही अंतिम मुदत गृहीत धरली जाते. यामुळेच पुढील 14 दिवसांत पेरणीच्या क्षेत्रात चांगली वाढ होऊ शकते, असा विश्वास कृषी विभागाला आहे.
जिल्ह्यातील शिरूर कृषी विभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यात 1 लाख 44 हजार 736 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे असून या हंगामात प्रामुख्याने भात, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीनसह अन्य पिकांची लावगड केली जाते. या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने कमी पावसाच्या भागात शेतकऱ्यांनी सोयाबीनसह मूग, उडीद, मटकी, चवळी, वाल पिकांचीदेखील पेरणी केली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कडधान्याचे क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.
जमिनीला वाफसा नसल्याने भुईमूग क्षेत्र घटणार
राजगुरुनगर उपविभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र 9 हजार 113 हेक्टर ऐवढे असून आजअखेर केवळ 14 टक्केच म्हणजे 1 हजार 240 हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पेरणी झाली आहे.