शिरूर: शिरूर पोलिस ठाण्यातंर्गत शेतामधून डाळिंब चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिसांना यश आले. आकाश काळे (वय 25) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, दि. 7 जुलै रोजी पहाटे मोटेवाडी (ता. शिरूर) गावचे हद्दीत संदीप येलभर यांच्या शेतामधील 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 400 किलो डाळिंब दुचाकी वरील चोरटयाने पळविले होते. याबाबत संदीप येलभर (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest Pune News)
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलिस अंमलदार यांना या गुन्ह्यातील चोरीस गेले डाळिंब व एमएच 12 वायई 4023 वरील चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. ही मोटारसायकल आकाश काळे याची असल्याची माहिती प्राप्त केली.
सोमवारी (दि. 14) पोलिस अंमलदार विजय शिंदे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आकाश काळे हा रांजणगाव परीसरामध्ये आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली रांजणगाव परिसरात आकाश काळे यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी आकाश काळे याला न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (दि. 16) पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले.