पुणे

Pune Accident News : झेड ब्रीज अपघात; कारचालकासह मालक अटकेत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून झेड पुलानजीक रस्त्यावरील चार ते पाच वाहनांना उडविणार्‍या कारचालकासह मालकावर गुन्हा दाखल करून विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली होती. यामध्ये एकाचा मृत्यू, तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. उमेश हनुमंत वाघमारे (48, रा. सिंहगड रोड), नटराज बाबूराव सूर्यवंशी (44, रा. चांदणी चौक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, विश्वनाथ रामचंद्र राजोपाध्ये (60, रा. नारायण पेठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत गणेश नाकती (48, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे हा कार चालवीत होता. फिर्यादी हे रिक्षा व्यावसायिक आहेत. शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुुमारास फिर्यादी नाकती हे प्रवासी घेऊन केळकर रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे निघाले होते. या वेळी अलका चौकाच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कारने त्यांच्या रिक्षासमोरील एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर फिर्यादीच्या रिक्षाला व इतर तीन ते चार वाहनांना धडक देऊन ती कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खांबाला जाऊन धडकली. कारमधील दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.

त्यांना येथील जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक आयुक्त वसंत कुंवर, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT