लॉटरी लागल्याचे सात वर्षे पत्नीपासून लपवले! | पुढारी

लॉटरी लागल्याचे सात वर्षे पत्नीपासून लपवले!

लंडन : बायकोपासून काही लपवायचं म्हटलं तरी अनेक नवरोबांना ते शक्य होत नाही. किंबहुना, चाणाक्ष बायका ते शोधून काढतातच असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा स्थितीत एका माणसाने आपल्याला लॉटरी लागली आणि तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले, एवढी मोठी गोष्ट बायकोपासून लपवून ठेवली आणि तीही चक्क सात वर्षे!

आता स्वतःच या माणसाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गुपित उघड केले आहे. त्याने सांगितले की, सात वर्षांपूर्वी त्याने स्क्रॅच कार्डद्वारे 1 कोटी रुपये जिंकले होते. हे त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले नाही आणि शांतपणे ही संपूर्ण रक्कम पेन्शनसाठी ठेवली. पत्नीला ही बाब सांगितली असती तर तिने कदाचित ही रक्कम इतरांशी वाटून घेण्याचा सल्ला त्याला दिला असता, असे त्याला वाटले होते.

त्याऐवजी त्याने हळूहळू ते सर्व पैसे त्याच्या पेन्शन खात्यात जमा केले. एरवी लॉटरी लागली की लोक आनंदाने हुरळून जातात, गाजावाजा करतात, स्वतःसाठी महागड्या वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करतात. मात्र, या माणसाने यापैकी काहीही केले नाही. इतकेच नव्हे तर इतकी मोठी गोष्ट पत्नी व अन्य कुटुंबीयांपासूनही दीर्घकाळ लपवून ठेवली. त्याची ही पोस्ट सुमारे 40 लाख लोकांनी पाहिली आणि बहुतांश लोकांनी त्याला ‘बोरिंग’ ठरवले! त्याने काहीही खर्च न करता, हौस न करता लॉटरीचे सर्व पैसे त्याच्या पेन्शन खात्यातच जमा केले, हे अनेकांना आवडले नाही. अर्थात, काही सुज्ञ लोकांनी त्याच्या या गुंतवणुकीचे समर्थनही केले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button