बारामती: आपल्याला एका ठिकाणी 'स्टिंग ऑपरेशन'साठी जायचे आहे, असे सांगून 'यू-ट्यूब न्यूज चॅनेल'मधील सहकारी महिलेला बारामतीत आणत दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत त्याचा 'व्हिडीओ' तयार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात शेख अजहर कादरी (रा. कोंढवा, पुणे) व ओंकार राजेंद्र शेलार (रा. भिगवण, ता. इंदापूर) या दोघांविरोधात बलात्कारासह ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिगवणमधील पीडितेने याप्रकरणी फिर्याद दिली. पीडिता शेलार याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून शेख अजहर कादरी याच्या 'मी मराठी क्रांती न्यूज' या 'यूट्यूब' चॅनेलची सहकारी म्हणून भिगवण-इंदापूरचे काम पाहत होती. दि. ३ ऑक्टोबर रोजी ती घरी असताना ओंकार शेलार हा तेथे आला, त्याने आपले सर शेख अजहर कादरी हे आले आहेत, त्यांचे तुमच्याकडे काम आहे, ते बाहेर गाडीत बसले आहेत, असे सांगितले. संबंधित महिलेने बाहेर येत पाहिले असता एका गाडीत शेख अजहर कादरी हा बसला होता. तिने काय काम आहे, असे विचारले असता त्याने, तू गाडीत बस मग आपण बोलू, असे सांगितले. त्यानंतर ते पुणे-सोलापूर हायवेवर असलेल्या एका हाॅटेलात जेवणासाठी गेले. जेवण झाल्यावर तिने घरी जाते, असे सांगितल्यावर शेख अजहर कादरी याने आपल्याला एक 'स्टिंग ऑपरेशन' करायचे आहे, त्यासाठी बाहेर जायचे असून, तू शेलार याच्या गाडीत बस असे सांगितले. त्यानुसार ती शेलार याच्या गाडीत बसली.
तेथून हे तिघे बारामतीत आले. एमआयडीसीतील एका लाॅजवर त्यांनी खोली घेतली. हे तिघे खोलीत गेल्यानंतर काही वेळाने शेलार हा बाथरुममध्ये गेला. त्यावेळी शेख अजहर कादरी याने तिच्या अंगाशी लगट करणे सुरू केले. तिने प्रतिकार केला असता, तुला मी कोण आहे माहीत आहे ना, माझे पुण्यातील मोठमोठ्या टोळींशी संबंध आहेत, मी तुला कुठे पोहोचवेल हे समजणार सुद्धा नाही, असे म्हणत तिच्यावर जबरदस्ती केली. यावर ओंकार याने बाथरुममधून बाहेर येत त्याचे व्हिडीओ शूटिंग केले.
त्यानंतर ओंकार याने मोबाईल अजहर कादरीकडे देत महिलेशी शारीरिक संबंध केले व त्याचे शूटिंग कादरी याने केले. त्यानंतर तिला जातीवाचक बोलत, तुमच्यात हे चालतेच. कोणाला काही सांगितले तर तुला कुठे पोहोचवू हे समजणार पण नाही, तुला व तुझ्या मुलांना मारून टाकू असा दम तिला दिला. दुसऱ्या दिवशी दि. ४ ऑक्टोबर रोजी तिला भिगवणमधील घरी सोडण्यात आले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी महिलेने प्रतिनिधीपदाचा राजीनामा शेख अजहर कादरी याच्या व्हाॅट्सअपवर पाठवला असता त्याने तो स्वीकारत नसल्याचे सांगितले.
दि. १५ नोव्हेंबर रोजी ती भिगवणमध्ये एका सराफी दुकानाबाहेर उभी असताना शेलार याने तेथे येत, तू समोरील गाडीत जाऊन बस, सरांनी आपल्याला पुण्याला बोलावले आहे, असे सांगितले. फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यावर शेलार याने तिला शिवीगाळ, दमदाटी केली. घाबरून या महिलेने काही दिवस नातेवाइक व मैत्रिणींकडे काढले. त्यानंतर तिने बारामतीत येत याप्रकरणी फिर्याद दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.