रामदास डोंबे
खोर: एकेकाळी दौंड तालुक्यातील कबड्डी, कुस्ती, मल्लखांब, नृत्य, नाटक यांना तरुणाईची गर्दी होत असायची. आता मात्र मोबाईलच्या मोहात अडकलेली हीच पिढी खेळाची मैदाने आणि कला क्षेत्रापासून दूर जाताना दिसत आहे. गावोगावची मैदाने आता शांत होत चालली आहेत. व्यायामशाळा सुनसान झालीत. भल्या मोठ्या रंगमंचांवर कलाकारांच्या जागी मोबाईल कॅमेर्यासमोर नाचणारे ‘रील्स मेकर्स’ वाढले आहेत.
पूर्वी गावात कार्यक्रम असला की रंगमंच फुलून जात होता. आता मात्र तरुण मुले सोशल मीडियावर दोन मिनिटांचा व्हिडीओ टाकून त्यालाच कला समजू लागले आहेत. खरी मेहनत घेणारे कलाकार कमी होत चाललेत, असे काही जाणकार मंडळी सांगतात. (Latest Pune News)
मोबाईलचा अतिरेक तरुणांना एकाकीपणाकडे नेत आहे. शारीरिक हालचाल कमी झाल्याने स्थूलता, मानसिक ताण, एकाग्रतेचा अभाव, अशी लक्षणे वाढली आहेत. खेळ आणि कला हेच तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे खरे साधन आहे. समाजाने त्यांना पुन्हा मैदान व रंगमंचाकडे वळवायला हवे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तरुणांसह लहान मुलांचाही मोबाईलकडेच सर्वांत जास्त ओढा असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी शाळास्तरावर वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बंधनकारक करावेत. जिल्हा परिषद व शासनाने गावोगावी युवकांसाठी व्यायामशाळा, क्रीडांगणे उभारावीत. पालकांनी घरात मोबाईल वापरावर काटेकोर वेळ ठरवावी. स्थानिक क्रीडापटू व कलाकारांचा सत्कार करून तरुणाईला प्रेरणा द्यावी, अशा काही उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
मी कुस्ती खेळायला जिल्हापातळीपर्यंत गेली होती. त्या वेळी माझ्या शेजारील मुली दिवसभर मोबाईलवर गेम्स खेळत बसल्या होत्या. मैदानात येणे तर दूरच, त्यांना सराव करायला देखील आवडत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.- समीक्षा चौधरी, कुस्तीपटू, खोर
पूर्वी मुले अभ्यासानंतर मैदानावर धावत असायची. आता मात्र ते मोबाईलवर ’फ—ी फायर’ आणि ’रील्स’मध्ये रात्र काढत आहेत. या व्यसनामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.- जालिंदर डोंबे, पालक, खोर
पाठीमागील काळात शाळेनंतर मातीच्या आखाड्यात कुस्तीचा सराव हा दैनंदिन भाग होता. आता मात्र आखाडे रिकामे झालेत. मोबाईलवर वेळ घालविणे सोपे वाटते. पण, त्यातून शरीरसंपदा किंवा आत्मविश्वास हरवत चालला आहे. तरुणांनी कुस्तीकडे व शरीर संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे.- प्रा. हनुमंत हेगडे, कुस्तीपटू व प्रशिक्षक, दौंड