पौड : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात शरद मोहोळ याचा पुण्यातील सुतारदरा येथे झालेल्या खुनानंतर यात सहभागी असलेले काही आरोपी हे मुळशी तालुक्यातीलच असल्याने मुळशीतील तरुणाईत गुन्हेगारीची क्रेझ कायम असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात मुळशीतील गुन्हेगारीची भडक मांडणी करण्यात आलेली होती. औद्योगिक भागात कामगार किंवा स्क्रेपचे ठेके, टोळी वर्चस्व, मुळशीतील जमिनीला आलेल्या सोन्याच्या भावामुळे जमीन व्यवहार, बदला या व अनेक कारणांमुळे होणारे खून आणि मुळशीतील गुन्हेगारी कायम चर्चेत असते. पौड येथे महेश मेंगडे, पौड फाटा येथे संदीप मोहोळ, नीलायम टॉकीजजवळ किशोर मारणे, सुतारवाडी येथे पिंट्या मारणे, भुकूम येथे एकनाथ कुडले, आंबेगाव येथे बाळासाहेब मारणे किंवा इतर काही जणांचे झालेले खून हे याच कारणांमुळे झालेले असल्याचे दिसून येत आहे.
मुळशी तालुक्यातून पुणे शहरातील कोथरूड, सुतारदरा, शास्त्रीनगर, काळेवाडी, किष्किधांनगर भागात अनेक जण कामानिमित्त राहायला गेलेले आहेत. या भागात कोणत्या तरी भाईच्या गँगमध्ये सामिल होऊन मुळशी तालुक्यात आपल्या गावात येऊन निवडणूक, सण किंवा इतर वेळी दहशत निर्माण करणारे अनेक छोटे-मोठे भाई निर्माण झाले आहेत. गावात राहणारा ग्रामस्थ यांच्यापुढे टिकू शकत नाही किंवा होणार्या दहशतीची कोठेही वाच्यता करत नाही. या दहशतीच्या घटना पोलिस ठाण्यापर्यत जाणे दुरच. मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामे चालू आहेत, तसेच अनेक ठिकाणी डोंगर फोडून प्लाँटीग करण्याचे अनाधिकृत उद्योग सुरू आहेत.
या ठिकाणी बिल्डर आणि प्लाँट मालकांनीही गुन्हेगारांनाच ठेके देत आपले काम पुढे चालू ठेवले आहे. या कामाचे ठेके गुन्हेगारांना मिळाल्याने तेथे जाऊन ते काम थांबविण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. काही दिवसांपूर्वी एका गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या अनेक गुन्हे असलेल्या आरोपीने पोलिसांच्याच अंगावर कुत्रे सोडण्याचा प्रकार घडला होता. मात्र गेले काही दिवस मुळशी तालुक्यातील शांत असलेले टोळी युध्द शरद मोहोळ याच्या खूनानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. यावरून मुळशीतील तरूणाईत गुन्हेगारीची क्रेझ कायम असल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे.
मुळशी तालुक्यात सक्रिय असलेल्या तसेच परिसर व गावात दहशत असलेल्या दोन टोळ्यावर मोक्का लावण्याची कारवाई सुरू आहे. तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनाही वागणूक सुधारावी यासाठी समज देण्यात आली आहे.
मनोजकुमार यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पौड
पौड पोलिस ठाण्यातंर्गत घडलेल्या गुन्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल असलेल्या टोळीवर पोलिसांनी यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केलेली होती. यामध्ये अनेक जण सध्या जेलमध्ये असून बाहेर आलेले शांत आहेत. मात्र गरम रक्त असलेले 18 ते 25 वयोगटातील तरूणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
कुख्यात शरद मोहोळचा सुतारदरा येथे खून झाल्यानंतर मुळशी तालुक्यात घटनेची माहिती वाऱ्यागत पसरली. मोहोळ याचे मूळ गाव असलेल्या मुठा गावापासून घोटावडे ते पिरंगुट दरम्यान पौड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 5) कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फिरता पहारा ठेवला होता.
हेही वाचा