भारतासारखा विश्वासू मित्र असल्याने बांगलादेश खूप नशीबवान : शेख हसीना | पुढारी

भारतासारखा विश्वासू मित्र असल्याने बांगलादेश खूप नशीबवान : शेख हसीना

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bangladesh Election : बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. विरोधी पक्ष बीएनपीसह इतर अनेक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. बांगलादेशात निवडणुकीपूर्वी अनेक हिंसक घटना घडल्या असून मतदानाच्या दिवशीही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. निवडणुकीपूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताशी संबधीत मोठे विधान केले आहे. ज्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात केली जात आहे.

शेख हसीना यांच्याकडून भारताचे कौतुक

मतदानापूर्वी पंतप्रधान शेख हसीना यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान एका भारतीय पत्रकाराने पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चर्चा केली. यावर शेख हसीना म्हणाल्या, ‘तुमचे खूप स्वागत आहे. भारतासारखा विश्वासू मित्र मिळाल्याने आपण खूप भाग्यवान आहोत. भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात आम्हाला साथ दिली. 1975 नंतर आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावर भारतानेच आम्हाला आश्रय दिला होता. त्यामुळे भारतातील जनतेच्या पाठीशी आमच्या शुभेच्छा कायम असतील. बांगलादेश हा सार्वभौम आणि स्वतंत्र आहे. आमची लोकसंख्या मोठी आहे. आम्ही जनतेला लोकशाही अधिकार दिले आहेत. देशात लोकशाही कायम राहावी अशी माझी इच्छा आहे.’

बांगलादेशमध्ये निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

127 देशांतील निरीक्षक आणि 73 पत्रकार बांगलादेशच्या निवडणुका कव्हर करण्यासाठी अधिकृतपणे बांगलादेशमध्ये आहेत. बांगलादेशमध्ये रविवारी 12व्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. बीएनपीसह सर्व विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. काळजीवाहू सरकारच्या देखरेखीखाली सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात, अशी विरोधी पक्षांची मागणी होती, मात्र शेख हसीना सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला. याच्या निषेधार्थ विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. अशातच कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 17 मतदान केंद्रे हल्लेखोरांनी पेटवून दिली आहेत.

बांगलादेशच्या निवडणूक आयोगानुसार, रविवारी 42,000 हून अधिक मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानात एकूण 11.96 कोटी नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 27 राजकीय पक्षांचे 1,500 हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याशिवाय 436 अपक्ष उमेदवारही आहेत.

Back to top button