पुणे: प्रेमसंबंध तोडून टाकल्याच्या कारणातून तरुणाने प्रेयसीवर पिस्तुलातून तीनवेळा गोळीबाराचा प्रयत्न केला. गोळी फायर न झाल्यामुळे सुदैवाने तरुणी थोडक्यात बचावली. ही घटना बाणेरमधील वीरभद्रनगर येथील एका खासगी संस्थेच्या आवारात शुक्रवारी (दि. 29) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनास्थळी एक जिवंत काडतूस मिळून आले आहे.
याप्रकरणी पिंपळे गुरवमधील 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव नायडू याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा बाणेर पोलिसांनी दाखल केला आहे. भरदिवसा प्रेयसीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी पिंपळे गुरव येथील राहणारी आहे. ती एमबीए अभ्यासक्रमाला असून, बाणेर वीरभद्रनगर येथील एका खासगी संस्थेत प्रशिक्षण घेते. शुक्रवार हा तिच्या प्रशिक्षणाचा संस्थेतील शेवटचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून तरुणी गौरवसोबत बोलत नव्हती. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. तरुणीचे पिंपळे गुरव येथील घर त्याला माहीत होते. परंतु, ती जेथे प्रशिक्षणासाठी जाते ती संस्था कदाचित माहिती नसावी. गौरवने सकाळी तरुणीचा घरापासूनच पाठलाग केल्याचा संशय पोलिसांना आहे.
सकाळी पावणेदहाच्या सुमारास तरुणी संस्थेच्या आवारात आली. ऑफिसच्या लिफ्टजवळ तिला गौरवने गाठले. या वेळी त्याने स्वतःच्या अंगावर डिलिव्हरी बॉयचा गणवेश परिधान केला होता. तरुणीला अडविल्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बोलण्यास नकार दिला. ‘तू जर माझ्यासोबत बोलली नाहीस, तर तुमचे खानदान संपवून टाकतो. जर ही माझी झाली नाही, तर मी हिला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिली.
तरुणी आपल्यासोबत बोलत नाही, या रागातून गौरवने तिच्यावर पिस्तूल रोखले. त्याने तरुणीवर तीनवेळा पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते लॉक झाल्यामुळे गोळी फायर झाली नाही. तरुणीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर संस्थेतील कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी तेथे धाव घेतली. ’तू आज वाचली, तुला परत सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन गौरव दुचाकीवरून पसार झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिमंडल-4 चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून पसार झालेल्या गौरवचा शोध घेण्यात येत आहे. गौरव एका खासगी कंपनीत काम करतो.
यापूर्वी त्याच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिस सांगतात. संबंधित संस्थेचे कार्यालय एका जुन्या इमारतीत आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध पोलिसांना लागला नव्हता.