येरवडा: येरवडा येथील डॉन बाॅस्को शाळा आणि चर्चसमोर असलेल्या पावसाळी वाहिनीत एका व्यावसायिक इमारतीचे सांडपाणी सांडले जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ही वाहिनी तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, ते शाळेच्या आवारात आणि चर्चच्या पायऱ्यांजवळ जमा होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणारे नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि जाताना या सांडपाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच, रविवारी प्रार्थनेसाठी येणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
माजी नगरसेवक जॉन पॉल म्हणाले, 'चर्च आणि शाळेशेजारी असलेल्या व्यावसायिक इमारतीचे सांडपाणी थेट पावसाळी वाहिनीत सोडले जात आहे. पावसामुळे ही वाहिनी तुंबून सांडपाणी परिसरात साचून राहत असल्याने चर्चमध्ये येणारे नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी व्यावसायिकाची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही.
येत्या आठ दिवसांत महापालिका प्रशासन आणि संबंधित व्यावसायिकाने ही समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.' महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी, तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळी वाहिनीत सोडण्यात येणार सांडपाणी थेट चर्चच्या पायऱ्यांवर आणि शाळेसमोर जमा होत आहे. प्रार्थना करताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित इमारतीच्या मालकावर तातडीने कारवाई करावी.फादर मायकल डिसुजा, डॉन बोस्को चर्च, येरवडा चर्च आणि शाळेच्या परिसरात तुंबणाऱ्या सांडपाण्याची
संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास सांगितले जाईल. यात इमारतीच्या मालकाचा दोषी आढळ्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. ही समस्या लवकरात लवकर सोडवून विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.प्रकाश वालगुडे, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय