Mosquito Pudhari
पुणे

Yerawada Dengue Cases: येरवड्यात डेंग्यूचा डंख! दोन महिन्यांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

जूनमध्ये ३ रुग्ण; जुलैमध्ये १९, तर ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांत आणखी १० रुग्णांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: सततच्या पावसामुळे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जून महिन्यात केवळ तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जुलैमध्ये ही संख्या सहापट वाढून १९ वर पोहोचली. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांतच आणखी १० रुग्ण आढळून आल्याची माहिती येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ उजवणकर यांनी दिली.

गेल्या दीड महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ नागरिकांसह महापालिका आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पावसामुळे घरांच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी, तसेच विविध वस्तूंमध्ये पाणी साचत असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी परिसरात पाणी साचणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या तीन ते चार दिवसांत ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, तसेच अंगावर पुरळ यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधे न घेता जवळच्या महापालिका दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास डेंग्यूची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते.

डॉ. उजवणकर म्हणाले, की पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला, तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणी साचून राहते. या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्ती डासांची पैदास होते. त्यामुळे नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. डेंग्यूचा संशय असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत.

नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी

  • घरातील पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ करून झाकून ठेवाव्यात.

  • फुलदाण्या, कूलर, टाकाऊ टायर, नारळाच्या करवंट्या आदींमध्ये पाणी साचू देऊ नये.

  • डासांपासून बचावासाठी शक्यतो पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत.

  • ताप आल्यास स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • घर आणि परिसरात पाणी साचले असल्यास ते तातडीने काढून टाकावे.

  • डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास महापालिका आरोग्य विभागाला त्वरित माहिती द्यावी.

येरवडा, वडगाव शेरी आणि खराडी परिसरात डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित ठिकाणी महापालिकेच्या वतीने तातडीने आवश्यक ती औषधफवारणी करण्यात येईल.
डॉ. गोपाळ उजवणकर, आरोग्य अधिकारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT