नारायणगाव : जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाची लाखो रुपयांची यंत्रसामग्री व जुन्या गाड्या येडगाव धरणाजवळ धुळखात पडल्या असून ही यंत्र सामग्री व गाड्या मोठ्या प्रमाणात गंजून गेल्या आहेत. या विभागाचे गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी मात्र याकडे जाणून-बुजून काळाडोळा करतात की काय अशा प्रकारची शंका यामुळे निर्माण होत आहे. वेळीच ही यंत्रसामग्री व जुन्या गाड्या लिलावाद्वारे विक्री केल्या असत्या तर शासनाच्या तिजोरीमध्ये काही रक्कम जमा झाली असती. परंतु उदासीन असलेले स्थानिक अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
येडगाव कॉलनी येथे टिपर, टँकर, ट्रक, क्रेन, वेल्डिंग प्लॅन्ट आदी सामुग्री अनेक वर्षे पडून आहे. येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, वडज व चिल्हेवाडी, पाचघर या धरणाच्या कामासाठी डंपर, रोलर व इतर मशिनरी आणण्यात आली होती. धरणाचे काम झाल्यानंतर बहुदा ही यंत्रसामग्री येडगाव कॉलनी येथेच धुळखात पडून आहे. येडगाव धरणाची सुरुवात सन 1970 ला झाली व धरण 1978 मध्ये पूर्ण झाले. पिंपळगाव जोगा धरणाचे काम सन 1990/91 ला सुरू झाले व 1998 ला या धरणाचे काम पूर्ण झाले. या सगळ्या धरणांच्या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री शासनाने खरेदी केली धरणांचे काम झाले; मात्र यातील अनेक यंत्रसामग्री व वाहने येडगाव कॉलनी येथे अक्षरश: धुळखात पडली असून मोठ्या प्रमाणात या वाहनांना व यंत्रसामग्रीला गंज चढला असून बहुतांशी यंत्रसामग्री सडली आहे.
शासनाची यंत्रसामग्री असल्यामुळे आपल्या खिशातलं काय जातंय असाच समज अधिकारी वर्गाचा झाला असावा. वास्तविक जी यंत्रसामग्री निकामी झाली आहे त्याचा लिलाव करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देणे अपेक्षित असते. परंतु बहुदा तसे न झाल्याने अनेक वर्ष ही यंत्रसामग्री सडून गेल्याचे पाहायला मिळत आहे.
या संदर्भात जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नांदोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यांत्रिकी विभाग स्वतंत्र असून ही जबाबदारी त्यांची असल्याचे सांगून आपले हात झटकले.
याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्याला दिलेला आहे. तथापि शासनाच्या निर्देशाप्रमाणे लिलावाची बोली लागत नसल्याने हे लिलाव होत नाहीत. मग पुन्हा या यंत्रसामग्रीयेडगाव धरणाजवळ लाखोंची यंत्रसामग्री धुळखात; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची चर्चाची सध्याची किंमत काढून पुन्हा लिलाव जाहीर करावे लागतात. आता लवकरच ही प्रक्रिया आम्ही राबवणार आहे.निवृत्ती खंडवे, कार्यकारी उपअभियंता, जलसंपदा यांत्रिक विभाग