पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला बी.कॉम आणि एमसीए हे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेवर कोणतीही मर्यादा नसेल. इच्छुक विद्यार्थी कितीही संख्येने प्रवेश घेऊ शकतील. यापूर्वी विद्यापीठाला बीसीए व एमबीए ऑनलाइन अभ्यासक्रमांची मान्यता मिळाली होती, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार
डॉ. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आधीपासून दूरस्थ पद्धतीने विविध प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जात आहेत. राज्यभरातील अभ्यासकेंद्रामार्फत हे कार्यक्रम राबवले जात असले तरी यंदापासून ऑनलाइन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना औपचारिक सुरुवात झाली आहे.
यूजीसीच्या डिस्टन्स एज्युकेशन बोर्डाने बी.कॉम आणि एमसीए या अभ्यासक्रमांना ऑनलाइन स्वरुपात परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार आहे. यामुळे विशेषतः नोकरी करणारे, ग्रामीण भागातील आणि नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून सखोल तयारी केली आहे. अभ्यासक्रमाच्या क्रेडिटनुसार व्हिडीओ व्याख्याने तयार करण्यात आली असून, एका क्रेडिटसाठी सुमारे १५० व्हिडीओ असतील. प्रत्येक व्हिडीओ सात ते दहा मिनिटांचा असेल. विद्यार्थ्यांना एक व्हिडीओ पूर्ण केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्नावली सोडवावी लागेल. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील व्हिडीओ उपलब्ध होईल. याशिवाय प्रत्येक शंभर विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर नेमला जाईल. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि ई-मेलच्या माध्यमातून मेंटॉर विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणार आहेत.
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने...
परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टर-बेस्ड पद्धतीने घेतल्या जातील, ज्यामुळे पारदर्शकता व गुणवत्ता राखली जाईल. या निर्णयाने महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहे. विद्यार्थ्यांना आता घरी बसूनच बी.कॉम आणि एमसीए सारखे अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अद्ययावत माहिती घ्यावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.