खुटबाव: पुणे-सोलापूर महामार्गावर यवत (ता. दौंड) हद्दीत तीन मोटारींचा अपघात झाला. यात 10 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.
अपघातप्रकरणी यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा ही सोलापूरहून पुण्याकडे जात होती. ती कार यवत गावच्या हद्दीतील भुलेश्वर फाटाजवळ आली. (Latest Pune News)
त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि इनोव्हा कार दुभाजक ओलांडून पुणे-सोलापूर महामार्गावर गेली. तिने पुण्याकडून येणार्या स्विफ्ट आणि किया (एमएच 12 डब्ल्यू जे 6088) या दोन कारला धडक दिली. या अपघातात स्विफ्ट आणि किया कारमधील 10 जण जखमी झाले. तर दोघे गंभीर आहेत.
अपघातानंतर इनोव्हा कारचालक कार घटनास्थळी सोडून पळून गेला. याप्रकरणी स्विफ्टचालक शंकर संभाजी सोनवणे (वय 28, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इनोव्हा कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार सुनील नगरे करीत आहेत.
दरम्यान, यवत गावच्या हद्दीतच गेल्या दहा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे कार महामार्गावरील दुभाजक ओलांडून अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा अशाच प्रकारे अपघात झाल्यामुळे महामार्गावरील कमी उंचीच्या दुभाजकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.