लोणी काळभोर : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्याशी संबंधित जमीन व्यवहारात प्रचंड मनमानी करत ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा न करताच ‘सामंजस्य कराराला’ (चजण) मंजुरी दिल्याचा आरोप समोर आला असून सुमारे 36 कोटी रुपये बेकायदेशीररीत्या वर्ग केल्याचे तीन संचालकांनी उघड केले आहे.(Latest Pune News)
या प्रकारामुळे बाजार समितीतील सभापती आणि सचिवांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संचालक मंडळाला अंधारात ठेवून आर्थिक व्यवहार रेटण्यात येत असल्याची चर्चा समितीत रंगली आहे.
दि. 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत सचिवांनी यशवंत कारखान्याच्या सामंजस्य कराराला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख करत ठराव मंजूर केला; मात्र हा मसुदा मंडळासमोर कधीच सादर झाला नव्हता, अशी माहिती माजी सभापती दिलीप काळभोर, ज्येष्ठ संचालक रोहीदास उंद्रे आणि प्रशांत काळभोर यांनी दिली आहे.
या प्रकरणाबाबत विचारले असता बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी “सामंजस्य कराराचा मसुदा संचालक मंडळासमोर ठेवण्यात आला होता.” एवढेच सांगत पुढील भाष्य टाळले. त्यांच्या सावध प्रतिक्रियेनेच या वादग््रास्त व्यवहारातील गोंधळावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
संचालकांनी यापूर्वीच लेखी पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, कारखान्याशी व्यवहार करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. तरी देखील याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून सभापतींनी मनमानीने रक्कम वर्ग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नोंदणीकृत सामंजस्य करार न करता, फक्त नोटराईज दस्तऐवजावर बाजार समितीने तब्बल 36.50 कोटी रुपये कारखान्याला वर्ग केले. कोणत्याही सभेची मान्यता न घेता हा व्यवहार केल्यामुळे कायदेशीरतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
झालेले सर्व व्यवहार मला मान्य नाहीत. पूर्वी अशाच प्रकारे केंजळे जमिनीचा व्यवहार अडकून पडला आहे. त्यामुळे लेखी पत्राद्वारे सूचित केल्याप्रमाणे कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच पुढील रक्कम अदा करावी आणि संचालक मंडळाची मान्यता घेण्यात यावी.दिलीप काळभोर, माजी सभापती, बाजार समिती पुणे
बैठकीत सामंजस्य करारावर चर्चा करण्यात आली होती. या विषयावर सर्वाधिकार मला दिलेले होते. ठराव वाचून कायम करताना बैठकीत विषय झालेला आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांनी तो नोंदवावा.प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे
संचालक मंडळाच्या बैठकीत सामंजस्य करार आलाच नाही अथवा यावर कोणतीही चर्चा झाली नाही. आजपर्यंत संचालकांना सामंजस्य कराराची प्रत देखील देण्यात आली नाही. संचालक मंडळाचे मत न घेताच कारखान्याला 36 कोटी परस्पर वर्ग करण्यात आले.रोहिदास उंद्रे, संचालक, बाजार समिती, पुणे