पुणे: थॅलेसेमिया, ल्युकेमिया, ॲप्लॅस्टिक ॲनिमिया, प्राथमिक इम्युनोडिफिशियन्सी असे रक्तविकार असलेल्या रुग्णांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा अनेकदा जीवनदान देणारा उपाय ठरतो. परंतु, दाता न मिळाल्याने किंवा उपचाराचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. त्यामुळे दाता नोंदणीसाठी जनजागृतीची गरज आणि प्रत्यारोपणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याची गरज डॉक्टरांकडून अधोरेखित केली जात आहे.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) हे दुर्मीळ रक्त विकारांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे. सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि प्लास्टिक ॲनिमिया अशा आजारांमध्ये रुग्णांचे अस्थिमज्जा निरोगी रक्त पेशी तयार करू शकत नाही.
प्रत्यारोपणाद्वारे रुग्णाच्या निकामी अस्थिमज्जाच्या जागी निरोगी अस्थिमज्जा बसवले जाते. त्यामुळे नवीन आणि निरोगी रक्त पेशी तयार करू लागते. यामुळे आजार बरा होण्यास मदत होते. याबाबतच्या जनजागृतीसाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अस्थिमज्जा दाता दिन साजरा केला जातो.
रुबी हॉल क्लिनिकमधील सिनियर कन्सल्टंट, क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट डॉ. विजय रमानन म्हणाले, प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये तीन मुख्य टप्पे असतात. प्रथमतः रुग्णाच्या शरीरातील रोगग्रस्त अस्थिमज्जा नष्ट करण्यासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी दिली जाते. यामुळे नवीन पेशींना जागा मिळते.
यानंतर निरोगी दात्याकडून घेतलेल्या अस्थिमज्जेच्या पेशी रुग्णाच्या शिरेतून (इंट्राव्हेनस) दिल्या जातात. या पेशी आपोआप रुग्णाच्या अस्थिमज्जेच्या जागेवर पोहोचतात आणि नवीन पेशी तयार करायला लागतात. यानंतर रुग्णाला विशिष्ट देखरेखीखाली ठेवले जाते.
दाता कोण असावा?
वय 18 ते 50 वर्षे
निरोगी व्यक्ती, गंभीर संसर्ग किंवा हृदय/ फुप्फुस विकार नसावा
रुग्णाच्या ह्युमन ल्युकोसाईट अँटिजेनशी जुळणारा दाता आवश्यक
स्टेम सेल डोनर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करून ठेवणे महत्त्वाचे
जनजागृती, खर्च व संपर्क
बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा खर्च 15 ते 25 लाख रुपये इतका येतो.
ऑलोजेनिक (दाता मिळवून केलेला) ट्रान्सप्लांट अधिक खर्चीक असतो. काही सरकारी रुग्णालये तुलनेने कमी खर्चात सुविधा उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय रजिस्ट्रीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करता येते. रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्रात संपर्क साधावा.
प्रत्यारोपणानंतर काय काळजी घ्यावी लागते?
प्रत्यारोपणानंतर रुग्णाला काही महिने किंवा कधी-कधी वर्षभर विशेष काळजी घ्यावी लागते.
रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते.
ग्राफ्ट-व्हर्सस-होस्ट रोग टाळण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर काही औषधे देतात, जी नियमितपणे घेणे आवश्यक आहे.
स्वच्छ आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. कच्चे आणि अर्धवट शिजवलेले अन्न टाळणे महत्त्वाचे आहे.
प्रत्यारोपणानंतर नियमितपणे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणे महत्त्वाचे आहे.
रुग्णाला आणि कुटुंबाला मानसिक आधाराची गरज असू शकते.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक मोठी शस्त्रक्रिया मानली जाते. यातील संभाव्य धोक्यांमध्ये संक्रमण आणि प्रत्यारोपण अपयश यांचा समावेश आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान आणि औषधांमुळे या धोक्यांचे प्रमाण कमी झाले आहे. योग्य जुळणी असलेला दाता आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार यामुळे प्रक्रिया सुरक्षित मानली जाते.- डॉ. विजय रमानन, क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक