

पुणे: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नव्याने मान्यता देणे व शालार्थ आयडी देताना नव्याने कार्यपद्धती लागू केली आहे. याबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी सर्व जिल्हा परिषद, सर्व शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी सर्व महापालिका या सर्वांना तसे निर्देश दिले आहेत.
वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर प्रस्ताव शालार्थ मान्यतेकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यतेच्या आदेशासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ई-ऑफिसमार्फत सादर करावा. याच ई-ऑफिसमधील प्रस्तावावर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षक- शिक्षकेतर पदावरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल.(Latest Pune News)
प्रस्ताव मान्य झाल्यानंतर शालार्थ आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव व ई-ऑफिस जावक क्रमांकासह वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ मान्यतेकरिताचा प्रस्ताव ई-ऑफिसमार्फत विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करावा.
प्रस्ताव मान्य झाल्यास शालार्थ आयडीचे आदेश ई- ऑफिसच्या जावक क्रमांकासह निर्गमित करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्तावासोबत शालार्थकरिता प्राप्त झालेली कागदपत्रे व मूळ वैयक्तिक मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ मान्यतेचे, अमान्यतेचे आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करणे गरजेचे आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश प्रत, संबंधित खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असेल. दि. 7 नोव्हेंबर 2012 ते 18 नोव्हेंबर 2016 या कालावधीत शालार्थ आयडी आदेश निर्गमित केलेले नाहीत.
दरम्यान कर्मचाऱ्यांचा खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत. ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश (लागू असल्यास) ही अभिलेखे शालार्थ प्रणालीवर दि. 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अपलोड झालेले नसल्यास अशा कर्मचाऱ्यांबाबतीत तत्काळ खातरजमा करावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
फौजदारी गुन्हा दाखल होणार
वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासकीय निधीचा अपहारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही विनाविलंब करावी तसेच अधिकाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी आदेश एकत्रित संग्राही ठेवावेत, असे आदेश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.