पुणे: भारतीय हवाईदलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडरच्या घरातून दोन चोरट्यांनी पहाटेच्या वेळी धमकावून, सोने, हिरेजडीत दागिने असे 83 तोळे सोने, साडेसात लाख रुपयांची रोकड, दोन मोबाईल असा तब्बल 59 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. दरम्यान, या घटनेला पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे.
पोलिसांची पाच पथके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. परंतु, अद्याप पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. विंग कमांडरच्या बंगल्यात प्रवेश करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात देखील कैद झाले आहेत. परंतु, त्यांनी पळून जाताना आपण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होऊ नये, याची काळजी घेतल्याचे दिसते. (Latest Pune News)
ही घटना मंगळवारी (दि.15) पहाटे अडीच ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कौशल्या बंगलो, अपंग शाळेसमोर, वानवडी गावात घडली होती. याप्रकरणी वेरीन्दरकुमार रतनलाल जंडीयाल (वय 78) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादी जंडीयाल हे 1992 मध्ये भारतीय हवाईदलातून विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून ते वानवडी गाव येथे त्यांच्या कौशल्या बंगल्यात वास्तव्यास आहेत. पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासोबत ते राहतात. जंडीयाल हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात, तर त्यांच्या मुलाचा ग्रिजली मोटार वर्क नावाने व्यवसाय आहे.
सोमवारी रात्री अकरा वाजता जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते आपल्या खोलीत झोपले होते. पहाटे अडीच वाजता आवाजाने त्यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी आवाजाची मशिन कानाला लावली. त्या वेळी दोन व्यक्ती तोंडाला मास्क लावलेले त्यांनी त्यांच्या अंगावरील चादर ओढली. धमकावून अलमारीची चावी मागितली.
बेडसमोरील अलमारी हाताने ओढून त्यातील दागिने काढून घेतले. आम्ही तुम्हाला मारणार नाही, तुम्ही जर प्रेमाने अलमारीची चावी दिली तर. चोरट्यांनी त्यांच्याकडील स्क्रू ड्रायव्हरने अलमारीचा दरवाजा उचकटून रोकड काढून घेतली. तसेच, जंडीयाल आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईल हिसकावून घेत येथून हलले तर मारून टाकू, असे धमकावून पळ काढला.
जंडीयाल आणि त्यांच्या पत्नीने हॉलमध्ये येऊन पाहिले तेव्हा त्यांना हॉलचा ग्रिल दरवाजा तोडून चोरटे आत आले होते. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा आणि सुनेला आवाज देऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून जंडीयाल यांनी झालेला प्रकार सांगितला. त्यानुसार वानवडी पोलिसांनी धाव घेतली. बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोघे चोरटे कॅमेर्यात कैद झाल्याचे दिसून आले.
ही लुटीची घटना घडून पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. अद्याप पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचता आलेले नाही. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांची पाचपेक्षा अधिक पथके चोरट्यांच्या मागावर असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.