

Police officer suspended for gambling
पुणे: नारायण पेठेतील महापालिकेच्या वाहनतळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या छापा कारवाईत सापडलेल्या सहाय्यक फौजदाराला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 30) रात्री विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली होती.
महेश महादेव भुतकर असे निलंबित करण्यात आलेल्याचे नाव आहे. भुतकर हे पोलिस मुख्यालयात नियुक्तीला आहेत. बुधवारी (दि.30) संध्याकाळी नारायण पेठेतील एका वाहनतळाच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांनी टाकला. येथून पथकाने 32 जणांना ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान भुतकर हे स्वतःही त्या ठिकाणी पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळताना सापडले. त्यामुळे त्यांच्यासह 32 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भुतकर यांचे वर्तन शिस्तभंग करणारे, पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि जनतेच्या विश्वासास तडा देणारे असल्याचा ठपका ठेवत त्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.