

पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 देण्यात येत असताना व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान ’दादा’ या शब्दावरून एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्यांवरून सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचे पहायला मिळाले.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना महिला निवेदिकेने अजित पवारांना आमंत्रित करण्यापूर्वी व्यासपीठावर दोन दादा उपस्थित आहेत. यामध्ये एक रोहितदादा टिळक आणि दुसरे अजितदादा पवार असा उल्लेख केला. (Latest Pune News)
त्यावर अजितदादांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर, निवेदिका पुण्याच्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत चंद्रकांतदादा पाटलांना पुणेकरांनी स्वीकारले नाही. त्यांना कोल्हापूरला पाठवायचा विचार आहे का, असे विचारले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यासपीठावरूनच ’तुम्ही त्यांना पालकमंत्री होऊन दिले नाही,’ असे स्पष्ट केले, तर अजितदादांनी आम्ही महायुतीमध्ये सहभागी होतानाच पुण्याचा पालकमंत्री आमच्या पक्षाचा होईल, असा शब्द तुम्ही दिल्याची फडणवीसांना आठवण करून दिली.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात चंद्रकांत पाटलांना पुन्हा कोल्हापूरला पाठविण्याचा अजितदादांचा विचार असला तरी ते शक्य होणार नसल्याचे सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत, असा उल्लेख केला.
त्यावर अजित दादांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर काही लोक दादागिरी करत नाहीत, परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावर ते दादागिरी करतात, असे भासत असल्याचे सांगत अजितदादांना कोपरखळी लगावली. त्यामुळे ’दादा’ या शब्दावरून सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.