पुणे

शेतमालाला हमीभाव अन् बेरोजगारांना रोजगार मिळणार का? डॉ. कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की दबावतंत्र वापरलं जातं. मात्र, सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. वैयक्तिक टीका करण्याऐवजी देशातील महागाई कमी होणार का, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का, असे सवाल महाविकास आघाडीचे शिरूर मतदारसंघातील उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, योगेश ससाणे आदी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 29) पुणे दौर्‍यावर असून, शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ते सभा घेत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे. आज देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागत आहे, यातच इंडिया आघाडीचा विजय असल्याचे या वेळी कोल्हे यांनी सांगितले. वारंवार निधीबाबत जे सांगितले जात आहे, ते वक्तव्य पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या करातील हा पैसा असून, निधी हा कोणाच्याही मालकीचा नाही. विरोधकांकडून होत असलेल्या दमदाटीबद्दल खा. डॉ. कोल्हे म्हणाले, अशा दमदाटीला सर्वसामान्य जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. निवडणूक हातातून निसटते तेव्हा अशा पद्धतीने दमदाटी केली जाते.

अजित पवार यांना पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीच बारामतीत अडकावे लागत आहे, या प्रश्नावर कोल्हे म्हणाले, एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर चार जागांवर समाधान मानावे लागत असेल, तर ही परिस्थिती काय आहे, हे आपण समजावं. त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते तर एक पत्नींना उमेदवारी द्यावी लागते आणि दोन उमेदवार हे बाहेरून आयात करावे लागत आहे. आता यातच काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे, असा टोला या वेळी कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
सर्वसामान्य जनतेने याचा विचार करावा, जनतेच्या कररूपाचा पैसा हा लोकप्रतिनिधी विकासासाठी वापरत असतो. जर आपल्या विचारांचा उमेदवार नाही, त्यामुळे निधी नाही, असं असेल, तर ते लोकशाही प्रणालीला घातक असल्याचे या वेळी खा. डॉ. कोल्हे म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT