जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार यांचे अनेक प्रश्न आहेत. ते मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाची बैठक घेतली जाईल. राज्यातील कारखानदारीला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी (ता. पुरंदर) येथे सांगितले. जेजुरी उद्योजक संघाच्या जिमा सभागृहात उद्योजक व कामगार संघटना यांच्याशी शुक्रवारी (दि. 19) सुळे यांनी संवाद साधला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, कामगारांचे प्रश्न समजावून घेत ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहराबाहेरून बाह्यवळण रस्ता करावा, एमआयडीसीला पुरेसे पाणी मिळावे, राज्य शासनाने उद्योगांना सुविधा द्याव्यात, एक खिडकी योजना अधिक सक्षमपणे सुरू करावी, राज्य कामगार विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात, इतर राज्यांप्रमाणे उद्योगांना सवलती मिळाव्यात, प्रदूषण महामंडळ सक्षम करावे, आदी मागण्या केल्या.
आमदार संजय जगताप यांनी जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या वेळी उद्योजिका डॉ. मोनाली कुटे, ऋतुजा सोनवणे, आप्पा चौंडकर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या संवाद बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहुरकर, दत्तात्रय चव्हाण, विजय कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, गणेश जगताप, जयदीप बारभाई, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सचिव राजेश पाटील, जीसा संघटनेचे सुरेश उबाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र जोशी यांनी केले. आभार पांडुरंग सोनवणे यांनी मानले.
हेही वाचा