उरुळी कांचन पोलिस ठाण्याला मुहूर्त मिळाला : अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

उरुळी कांचन पोलिस ठाण्याला मुहूर्त मिळाला : अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : चौदा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे उद्घाटन होत आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.20) या पोलिस ठाण्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पावणे तीन वर्षे समाविष्ट झालेल्या या भागाला पुन्हा ग्रामीण अधीक्षक कार्यालयात समाविष्ट करण्यात आले आहे. या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दहा गावांचा समावेश आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांसह तब्बल 35 अतिरिक्त कर्मचार्‍यांचे बळ मिळणार आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयात 23 मार्च 2021 रोजी समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करून उरुळी कांचन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. गृह विभागाने पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील उरुळी कांचन पोलिस ठाण्याला 5 ऑक्टोबर 2023 रोजी मंजुरी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात पारगाव, उरुळी कांचन, माळेगाव, सुपा, निरा नृसिंहपूर अशा पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली होती.

पारगाव, सुपा पोलिस ठाणे तात्काळ सुरू करण्यात आले. माळेगाव पोलिस ठाणे महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आले. परंतु, उरुळी कांचन पोलिस ठाणे सुरू होऊ शकले नाही. हे पोलिस ठाणे तब्बल 14 महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत राहिले. बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी शनिवारी दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ठाण्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या ठाण्याला सध्या एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक यांच्यासह 32 पोलिस कर्मचारी असे एकूण 35 कर्मचारी मनुष्यबळ मंजूर झाले.

हेही वाचा

Back to top button