शिवनगर : आपल्या सर्वांच्या विश्वासाने व सहकार्याने मी मागील 40 वर्षे माळेगाव साखर कारखान्याशी निगडित आहे. माझी काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या निवडणुकीत तुम्ही आम्हाला संधी दिली, तर पुढील पाच वर्षांत खिसे फाटेपर्यंत पैसे देणार, असा शब्द कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी कारखाना सभासदांना दिला. कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तावरे कुरणेवाडी (ता. बारामती) येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
अलीकडच्या काळात आपल्या बारामती तालुक्यात विचारांची बैठक राहिली नसून हुकूमशाही सुरू आहे. मात्र, आपण सगळे जण स्वाभिमानी आहोत. प्रामाणिकपणे कष्ट करून दोन पैसे मिळविण्याची आपल्यात ताकद आहे. गुलामगिरी झुगारण्याची हिंमत आपल्यात आहे. असे असताना आपण घाबरायचे नाही. आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मतदानातून योग्य भूमिका बजावत आपली सहकारी साखर कारखानदारी वाचवली पाहिजे, असे तावरे यांनी नमूद केले.
मागील पाच वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. साखरेच्या ग्रेडनुसार दर ठरतो. एल, एम आणि एस असे तीन प्रकारचे ग्रेड असतात. मात्र, माळेगाव कारखान्याची साखर पांढरी, पिवळी आणि पिठी निघत असल्याने सभासदांना त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. सत्ताधार्यांनी त्यांच्या काळात फक्त एकच साखर गोडाऊन उभे केले, ते देखील अंदाजपत्रकापेक्षा 65 लाख रुपये ज्यादा देऊन; मात्र या गोडाऊनमधील साखर भिजल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. परंतु, विरोधक हे मान्य करायला तयार नाहीत. मखोटं बोल; पण रेटून बोलफ अशी अवस्था विरोधकांची आहे.
कारखान्याचे विस्तारीकरण केले त्या वेळी आम्ही एटीपी प्लांट उभारणीसाठी व्हीएसआयच्या तज्ज्ञांकडून प्लॅन मागवला. तद्नंतर आमची सत्ता गेल्यानंतर सत्ताधारी संचालकांनी व्हीएसआयच्या सल्ल्याने एटीपी प्लांट न उभारता कॉन्ट्रॅक्टरच्या सल्ल्याने उभारला आणि त्यामुळे तो पूर्ण कार्यक्षमतेने चालत नसल्याचा आरोप तावरे यांनी केला. आम्ही सत्तेतून बाहेर होताना 30 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. आज त्या 93 कोटींच्या घरात आहेत, 60 कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत, 18 कोटी शेअर्स वाढले आहेत. असे असताना कारखान्याला सत्ताधार्यांनी कर्जबाजारी केले. दुसरीकडे यंदाच्या गाळप हंगामात नेत्यांच्या सांगण्यामुळे 2800 रुपये प्रतिटन पहिली उचल दिली. त्यामुळे गेटकेनचा ऊस आपल्याला कमी मिळाला, गाळप कमी झाले, उत्पन्न कमी निघाले आणि नफा कमी झाला. इतरांच्या तुलनेत पहिला हप्ता दिला असता तर लाख ते सव्वा लाख टन अधिकचा ऊस मिळाला असता. अधिकच्या उसाचे गाळप करता आले असते आणि तोटा झाला नसता, असे मत तावरे यांनी व्यक्त केले. सध्या कारखान्याच्या आरोग्य विम्याचा बोलबाला आहे. परंतु, या विम्याविरोधात जवळपास 110 लोक उच्च न्यायालयात गेल्याचे तावरे यांनी सांगितले.
कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बँक कर्मचारी, शिक्षक आदींसह विविध संस्थांचे अधिकारी, कर्मचारी अजित पवार यांनी कामाला लावले आहेत. मात्र, त्यांची ही सत्तेची मस्ती सभासद उतरविल्याशिवाय राहणार नाहीत.-चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष, माळेगाव कारखाना
कारखान्याच्या निवडणुकीबाबत माझ्याकडे अनेक माणसे पाठवून अजित पवारांनी मला चेअरमनपदाची ऑफर दिली. त्या वेळी मात्र तुम्हाला माझे वय दिसले नाही. मी ठणठणीत वाटलो. मात्र, तुमची ऑफर धुडकावल्यानंतर माझे वय काढता, विस्मरणाच्या गप्पा मारता, अशी परखड टीका माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केली.