बारामती | पुढारी वृत्तसेवा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत राज्याचे लक्ष वेधले गेले असले तरी ती एक स्थानिक निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामतीतील गोविंदबागेत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “ही पूर्णपणे स्थानिक स्वरूपाची निवडणूक आहे. याकडे राज्यपातळीवरून विशेष लक्ष देण्याची गरज नव्हती. आजूबाजूच्या तालुक्यांचेही या निवडणुकीकडे फारसे लक्ष नाही.”
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवार असल्याने, शरद पवार यांनी केलेले हे वक्तव्य अधिकच चर्चेचा विषय बनले आहे.
पवार पुढे म्हणाले, “या निवडणुकीबाबत काही विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीपासूनच सर्वांना सोबत घेण्याचा दृष्टिकोन ठेवला असता, तर ही स्थिती उद्भवली नसती. आता ही निवडणूक १९ हजार सभासदांपुरती सीमित आहे. निकाल चार दिवसांत स्पष्ट होईल.”
ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी बारामतीतील सूतगिरणीबाबत काही वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “बारामतीत कधीच सूतगिरणी झाली नाही. एकेकाळी येथे कापूस पिकत होता, मात्र आता नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला सहभागी करून घेण्याची इच्छा असूनही, कापसाच्या अनुपस्थितीमुळे हा प्रकल्प पुढे नेण्यात आला नाही.”
राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी ५०० कोटींची तरतूद केल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “देशात पहिल्यांदा असा निर्णय महाराष्ट्राने घेतला असून, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडस दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे कौतुक करतो. महाराष्ट्र हे AI स्वीकारणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.”