लोणी काळभोर: आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार समितीत विलीन होण्यापूर्वी या बाजार समितीवर लोकनियुक्त सभापती भाजपचा बनवून अनेक वर्षाचे भाजपचे स्वप्न येत्या 18 तारखेला पूर्ण होणार का? हा सध्या हवेलीतील राजकारणातील कळीचा मुद्दा ठरला आहे.
राज्यात भाजपाची सत्ता असताना भाजपच्या ताकदीवर बाजी मारलेल्या बाजार समीतीवर भाजपाला डावलले तर राज्यात चुकीचा संदेश जाईल अशी कुजबुज हवेलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे. (Latest Pune News)
हवेली बाजार समितीच्या लोकनियुक्त संचालक मंडळाची निवडणूक 2023 ला झाली. ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी झाली राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व अजित पवार यांनी केले तर भाजपच्या पॅनलचे नेतृत्व चंद्रकांत पाटील, राहुल कुल, प्रदीप कंद यांनी केले भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.
संपूर्ण राजकीय ताकत पणाला लावली होती, काही झाले तरी अजित पवारांच्या हवेली तालुक्यातील सहकारातील राजकारणाला सुरुंग लावण्याचा चंग बांधला व भाजप च्या ताब्यात बाजार समिती आणून कार्यकर्त्यांना सहकारात बळकटी द्यायची असे ठरले होते, यावेळी भाजपच्या पॅनल मधील पाच उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर हरकती आल्या ते पाच जण निवडणूक रिंगणातून बाजूला पडणार हे निश्चित झाले परंतु मंञी चंद्रकांत पाटील यांनी ताकद पणाला लावून उमेदवारी अर्ज बाद होऊ दिले नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या तर भाजपाला 16 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले त्या नंतर सभापती पदाचा पेच निर्माण झाला भाजपचा संचालक सभापती झाला पाहिजे असा आग्रह चंद्रकांत पाटील यांनी धरला परंतु चर्चेनंतर दुसरा होणारा सभापती भाजपचा होईल असे ठरले.
आता सभापती दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्या नंतर भाजपा बाजार समिती ताब्यात ठेवायची हे विसरून गेली का काय अशी स्थिती सध्या राजकारणात सुरू असल्याची कुजबुच चालू आहे, अनेक वर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात यायची वेळ आली असताना भाजप नेते विसरून गेले की काय इतके उदासिनता सभापती बनवण्याच्या राजकारणात सध्या भाजप नेतृत्वाकडून सुरू आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.
बाजार समिती भाजपच्या ताब्यात ठेवने गरजेचे आहे कारण यामुळे विधानसभेला भाजपाला मदत होते शहरातील पर्वती, खडवासला, कोथरूड, ग्रामीण मधील भोर, मुळशी, हवेली या विधानसभा क्षेत्रात प्रभाव पडतो म्हणून राज्य मंत्री माधुरी मिसाळ या बाजार समिती बाबत कायम विधानसभेत लक्षवेधी मांडतात अखेर भाजपचे नेते काय निर्णय घेतात हे येत्या 18 तारखेला समजेल परंतु भाजपचे अनेक वर्षाचे मनःसुबे प्रत्यक्षात येतील का उधळले जातील हे समजेलच.