पुणे

सय्यदनगर, लुल्लानगर प्रभागातील उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष

अमृता चौगुले

सुरेश मोरे

कोंढवा : तीन प्रभागांची मोडतोड करून नव्याने अस्तित्वात आलेला प्रभाग क्रमांक 42 सय्यदनगर-लुल्लानगर हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. जुन्या तिन्ही प्रभागांतील काही विद्यमान नगरसेवकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लढण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे नवीन चेहरे व माजी नगरसेवक यांच्यातूनच काही जण उमेदवार असतील. त्यामुळे या नव्या प्रभागातील उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

प्रभागाच्या रचनेनुसार येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे प्राबल्य दिसत असले, तरी काँग्रेस, भाजप, मनसे यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व जाती-धर्मांचे लोक या प्रभागात असून, मुस्लिम मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. नागमोडी वळणे घेत नैसर्गिक खाणाखुणांना छेद देत सय्यदनगर-लुल्लानगर प्रभाग हा शहराच्या नकाशावर नव्याने बनलेला आहे.

नवी रचना सापशिडी सारखी!

अंधशाळा रामटेकडीच्या पायथ्यापासून भलामोठा यू टर्न घेत लुल्लानगर येथे विसावलेला हा प्रभाग आहे. उच्चभ्रू सोसायट्यांबरोबरच समतानगर, भीमनगर, इशरतबाग या तीन झोपडपट्ट्यांसह रामटेकडी येथील काही भाग या प्रभागात घेतला आहे. जुन्या प्रभाग क्रमांक 27 मधील काही भाग, 26 मधील काही भाग आणि 24 मधील काही भाग घेऊन सय्यदनगर-लुल्लानगर हा प्रभाग बनविण्यात आलेला आहे. साप-शिडीच्या खेळाप्रमाणे या प्रभागाची रचना करण्यात आली आहे. 26, 27 व 24 या जुन्या प्रभागांतील विद्यमान नगरसेवकांनी लढण्याची तयारी अन्य प्रभागांतून केली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचा अभाव येथे नक्कीच जाणवत आहे. या प्रभागात नव्याने इच्छुक असणार्‍या उमेदवारांची यादी मोठी आहे. काही दिवसांमध्येच येथील चित्र स्पष्ट होईल. मात्र, पक्षांतर्गत नाराजी या परिसरात मोठी पाहायला मिळेल. महाआघाडी होते किंवा नाही, हा 'जर तर'चा प्रश्न आहे.

इच्छुकांची गर्दी

इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारूकभाई इनामदार, रुक्साना इनामदार, हसिना इनामदार, संजय लोणकर, सुलभा लोणकर, अजित मुरलीधर लोणकर, युवराज लोणकर, अन्वर इनामदार; काँग्रेसकडून शोयब इनामदार, आम्मी नसीम शेख, इम्रान शेख; शिवसेनेकडून प्रसाद महादेव बाबर, उत्तरेश्वर शिंदे, रोहिणी कुरणे, भरत चौधरी, सचिन कापरे इच्छुक आहेत. भाजपकडून सत्पाल पारगे, महेंद्र गव्हाणे, अक्षय मदनराव शिंदे, अनिल घुले, प्रीती व्हिक्टर, संदीप शेळके, ईशा प्रवीण जगताप, प्रवीण जगताप; मनसेकडून साईनाथ बाबर, आरती बाबर, अमोल सिरस, रोहन गायकवाड, हुसेन शेख.

अशी आहे प्रभागरचना

अंधशाळा रामटेकडी, सय्यदनगर, गुलामअलीनगर, ससाणेवस्ती काही भाग, लक्ष्मीनगर, हेवन पार्क, आशीर्वाद पार्क, गणेश पार्क, नाइन हिल, क्लाउड नाइन, दोराबजी मॉल, इशरतबाग, कौसरबाग काही भाग, भीमनगर, पारगेनगर, कोणार्कपुरम, ब्रह्मा इस्टेट, कोंढवा खुर्द मारुती आळी, कुशल निवृत्ती सोसायटी, शिवनेरीनगरचा काही भाग, फकरी हिल, कृष्ण केवलनगर, कुबेरा पार्क, समतानगर, साहानी सुजान पार्क, माउंट कार्मेल स्कूल परिसर, पारशी कॉलनी, लुल्लानगर.

  • एकूण लोकसंख्या 54026
  • अनुसूचित जाती : 6096
  • अनुसूचित जमाती : 365
SCROLL FOR NEXT