पुणे : महापालिका निवडणूक महायुतीने एकत्र लढायची की स्वबळावर, याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय व राज्यपातळीवरील नेते घेतील. त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल. कार्यकर्त्यांना प्रभागरचना, मतदार नोंदणीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना दिल्याचे भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 2) सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यासह राज्यातील अनेक मोठ्या शहरांतील प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. या शहरांमधील पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीचे काम केले आहे. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच कार्यकर्ते काम करतील, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी बाणेरमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्या वेळी चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, महामंत्री राजेश पांडे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, विरोधक विविध नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक सर्व्हे घेत आहेत. त्यातून खोटी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महायुतीचे सरकार सामान्यांच्या हिताचे काम करत आहे आणि ते काम सर्वांपर्यंत पोहचवायचे आहे.
जागतिक योग दिन, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 15 ऑगस्टपर्यंत वृक्षारोपण करणे अशा कार्यक्रमांद्वारे आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच 25 जून हा काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचा काळा दिवस म्हणून लोकांना सांगणार आहोत. काँग्रेसने केलेला संविधानाचा अपमान आम्ही विसरणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची लोकप्रियताही मोठी आहे. ही लोकप्रियता आणि त्यांनी केलेली कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जा, अशा सूचना चव्हाण यांनी पदाधिकार्यांना दिल्या.
भाजप चांगल्या पद्धतीने काम करीत असल्यानेच भाजपला यश मिळत आहे, हे लोकांपर्यंत पोहचवा.
प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावून त्याचे संगोपन करायचे आहे.
आणीबाणीतून काँग्रेसने लोकशाहीचा गळादाबल्याची आठवण करून देणे गरजेचे.