

पुणे : राज्यात 12 ते 15 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे, तोवर मशागतीची कामे उकरून घ्या. सध्या भारी जमिनीत पेरणी केल्यास फायदा होईल. मात्र हलक्या, भरड जमिनीत पाणी खोलवर जात नाही. त्यामुळे अशा जमिनीत पेरताना घाई करू नका. मोठ्या पावसाची वाट पाहा, असा सल्ला ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी राज्यातील शेतकर्यांना दिला आहे.
डॉ. साबळे यांनी विकसित केलेल्या ‘साबळे मॉडेल’द्वारे यंदाच्या मान्सूनचा अंदाज दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नेमकी कारणे, यंदाचा मान्सून हंगाम 106 टक्क्यांपेक्षा राज्यात कसा राहील, जून-जुलैमध्ये राज्यातील कोणत्या भागात पावसाचा खंड राहील, सध्या शेतकर्यांनी काय करावे, याबाबत माहिती दिली.
जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी 106 टक्के पाऊस पडेल.
वार्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून
आणि जुलै महिन्यात अकोला, धुळे, राहुरी, परभणी, कोल्हापूर, पाडेगाव, निफाड येथे मोठे खंड राहण्याची शक्यता.
दापोली, पुणे, सोलापूर, नागपूर, धुळे, जळगाव व कराडमध्ये खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले.
कमी दिवसांत जास्त पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असेही वातावरण राहील.
(अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित.)