पुणे

उरुळी कांचन रेल्वे स्थानकाला उपनगरीय रेल्वेसेवेचा दर्जा केव्हा?

अमृता चौगुले

उरुळी कांचन(पुणे) : पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून उरुळी कांचन परिसर झपाट्याने विकसित होत आहे. शहरालगतचा भाग व शहरविस्ताराला अनुकूल परिस्थिती तसेच पूर्व हवेली, दौंड व पुरंदर या तालुक्यांतील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून या भागात शहरीकरण व औद्योगिकीकरणाला संधी असल्याने बदलत्या परिस्थितीला दळणवळणाची सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे दळणवळणासाठी मुख्य सेवा असलेल्या उरुळी कांचन शहरासाठी सुसज्ज उपनगरीय रेल्वे स्थानक तसेच मुख्य रेल्वेथांबा व प्रवासी अनुकूल सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पुणे ते दौंड रेल्वेमार्गावरील उरुळी कांचन स्थानकाला उपनगरीय सेवेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.

पुणे शहरालगत भविष्याचे उपनगर होऊ पाहणार्‍या उरुळी कांचन परिसरात शहरीकरण व औद्योगिकीकरणाने नागरी सुविधांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरात रोजगारानिमित्त असणारे हजारो नोकरदार, कामगार या ठिकाणी वास्तव्यास आहेत. शहरापासून जवळचा परिसर असल्याने या ठिकाणाहून शहरात जाणे नागरिकांना पसंत पडत असल्याने सुविधांची समस्या असूनदेखील रस्ते, रेल्वेमार्गाने नागरिक शहराकडे प्रवास करीत आहे. परंतु, वाढत्या प्रवासी समस्येवर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.

रेल्वे महसुलात उरुळी कांचन रेल्वे स्थानक हे चांगल्या प्रकारचे महसुली उत्पन्न मिळून देण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या प्रवासी सुविधा मिळाव्यात, अशी प्रवाशांची मागणी सातत्याने होत आहे. उरुळी कांचन रेल्वे स्थानक हे पुणे ते दौंड रेल्वे स्थानकावरील मुख्य स्थानक आहे. पुणे शहराकडील मांजरी, हडपसर, लोणावळा या भागाप्रमाणे उरुळी कांचन येथून प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर हे स्थानक असल्याने रेल्वे सुविधेला या ठिकाणी पसंती आहे. त्याचबरोबर परिसर विकसित होत असल्याने उपनगरीय सेवेला या ठिकाणी चालना मिळण्यासाठी वाव आहे.

जलद रेल्वेगाड्यांचीदेखील सुविधा नाही

मध्य रेल्वेकडून पुणे-सोलापूर, तर पुणे-मुंबई संपूर्ण रेल्वेमार्ग हा इलेक्ट्रिक केला गेला आहे. लोकल रेल्वे सुविधेला मोठे प्राधान्य या मार्गावर असूनदेखील लोकल रेल्वे सुविधा या मार्गावर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. पुणे-दौंड रेल्वेमार्गावर 6 वर्षांचा कालावधी लोटूनही प्रवाशांना जलदगतीने तसेच रेल्वेगाड्यांची अधिक संख्या असलेली नियमित रेल्वेसेवा या भागाला मिळू शकली नाही.

पर्याप्त साधनांवरच होतोय प्रवास

या रेल्वेमार्गावर लोकल रेल्वेची गरज व सुविधेसाठी केंद्र व राज्य सरकारदरबारी प्रयत्न होत नसल्याने उपनगरीय रेल्वे सुविधा व लोकलसेवा या ठिकाणी मिळत नाही. परिणामी, पर्याप्त रेल्वे साधनांवर नागरिकांना या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. ज्याप्रमाणे पुणे विभागाने लोणावळा रेल्वे स्थानकाला उपनगरीय सेवेचा दर्जा दिला, त्याचप्रमाणे उरुळी कांचन शहराजवळील मार्गाला द्यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT