सुनील माळी, पुणे
ना ते चॅनेलच्या जनमत चाचणीत बसत... ना ते केल्या जाणार्या वारेमाप दाव्या-प्रतिदाव्यांत बसत... ना ते सभांना ट्रक-ट्रॅक्टरमधून आणल्या गेलेल्या रोजंदारीवरच्या गर्दीत दिसत... ना ते तालेवार लेखण्यांच्या पत्रपंडितांच्या अंदाजांमध्ये असत... भल्याभल्यांना समजत नाही. काय ते? ते आहे लोकमानस... लोकांच्या मनीचं गुज, जनताजनार्दनाची निवड. यंदा कोणता पक्ष सत्तेवर येईल? एकच एक पक्ष येईल का, आघाडी-युती येईल? ठरवतं कोण? तर तेच ते लोकमानस. आपापल्या पॉकेटस् व्होटस्ची म्हणजेच हक्काच्या मतांच्या गठ्ठ्यांची गणितं बांधली जातात, अमूक दोन-तीन जातींना अन् तमूकएक-दोन धर्मांना सोशल इंजिनिअरिंगच्या गोंडस नावानं एकत्र केलं जातं.
त्या आधारावर निवडणुका लढवल्या जातात आणि जिंकल्यावर ही राजकीय गणितं कशी यशस्वी झाली, ते सांगणार्या वर्णनांनी वृत्तपत्रांचे रकाने सजवले जातात, चॅनेलवरच्या चर्चा रंगवल्या जातात, यू ट्युबरांच्या बूमपुढं पंडिती थाटात राज्यशास्त्रातले शब्दसाज मांडले जातात. हीच गणितं जिंकल्यावर सुलटी तर हरल्यावर उलटी मांडली की काम झालं... प्रत्यक्षातलं लोकमानस मात्र या दाव्यांपासून, राजकीय पंडितांच्या गणितांपासून खूपच दूर असतं. अगदी मतदानोत्तर चाचण्यांना म्हणजेच एक्झिट पोलनाही ते गवसत नाही. कारण ‘तुम्ही मत कुणाला दिलं’, असा अगदी उघडावाघडा प्रश्न कुणी अनोळखी माणसानं भर चौकात विचारला तर अगदी खरंखुरं उत्तर कुणी तरी देईल का? तुम्ही तरी द्याल का हो बूमवाले साहेब?...
लोक विचार करतात आणि विचार करून मत देतात. देशाची-राज्याची परिस्थिती काय आहे, ते नीट पाहून ते आपलं सरकार निवडतात. त्यांच्यावर ओतल्या जाणार्या पैशांचा, केल्या जाणार्या घोषणांच्या पावसाचा परिणाम काहीच होत नाही, असं नाही. तो थोडाफार होतोही. पण केवळ पैसा पेरून सत्ता हाती घेतली, असं आतापर्यंत तरी झालेलं दिसलेलं नाही आणि या देशाच्या अगदी भडकलेली भूक शांत करू न शकणार्यांकडनंही विवेकी, निर्णायक मतदान झाल्याचं दिसून आलंय. ही परंपरा खूप जुनी आहे.
आपल्या राज्यातल्या 1957 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संयुक्त महाराष्ट्र समितीकडं मराठी मन एकजुटीनं गेलं तर 1995 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अन् शिवसेनेनं इतिहास घडवत काँग्रेसपासून सत्ता खेचून घेतली, त्याला कारणीभूत होतं हेच लोकमानस. काँग्रेसचा महाराष्ट्रात पराभव होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पत्रपंडितांना तर त्याची गंधवार्ता लागणं अवघड होतं. पुण्यातल्या अखिल मंडईच्या कट्ट्यावर मध्यरात्रीपर्यंतच नव्हे तर अगदी पहाट होईपर्यंत राजकीय गप्पा रंगत. सर्वपक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांचा राबता असणारा तो कट्टा मंडई विद्यापीठाच्या नावानंही प्रसिद्ध होता. काँग्रेसचे नेते आपलाच विजय कसा होणार, ते तोंडभरून सांगायचे... पण त्याला छेद देणारी एकच एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे पूर्वाश्रमीचा पत्रकार असलेला राजकीय कार्यकर्ता... दीपक रणधीर. ज्या लोकमानसाची चर्चा आपण आता करतो आहोत, त्या लोकमानसाची नाडी या रणधीरला अचूक माहिती होती. त्यानं छातीवर हात ठेवून सांगायला सुरुवात केली, ‘भाजप-शिवसेनेचं सरकार येणार’. त्याही पुढं जाऊन ‘पुण्यात भाजपचे दिलीप कांबळे, शिवसेनेचे सूर्यकांत लोणकर हे कमकुवत वाटणारे उमेदवारही विजयी होणार’, असं त्यानं सांगायला सुरुवात केली तेव्हा आम्हा पत्रकारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंतच्या सर्वांनी हसून त्याची टिंगल केली.
पुढं निकाल लागला आणि खरंच युती सत्तेवर आली तेव्हा सर्वांना धक्का बसला. ‘हे भाकीत कसं केलं?’... वातावरण शांत झाल्यावर त्याला विचारलं तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर पत्रकारितेची पुढची वाट दाखवणारं ठरलं. ‘मी पुण्यातल्या कसबा पेठेतल्या जुन्या भागात गेलो. जुन्या कसबे पुण्याचा गावगाडा विस्कळीत होऊ लागलाय. पण अजून तो टिकून आहे. तिथला ओबीसी वर्ग काँग्रेसपासून दूर चाललाय, असं लक्षात आलं. त्यानंतर औरंगाबादला (आजच्या छत्रपती संभाजीनगरला) गेलो अन् तिथल्या मूळ गावाचा अंदाज घेतला तर तिथंही तशीच भावना व्यक्त होत होती. पहिल्यापासनं काँग्रेसचा बेस असलेला ओबीसी युतीकडं सरकल्याचं चित्र धक्कादायक होतं. पण त्याचा परिणाम एकच एक दिसत होता आणि तो म्हणजे सत्तांतर.’ ... त्यानंतर अगदी नरेंद्र मोदी यांच्या सत्तांतरापर्यंतचे अंदाज रणधीरनं वेळोवेळी व्यक्त केले अन् ते अचूक ठरले!
... एक गोष्ट कळत गेली अन् पुढे ती पक्की होत गेली आणि ती म्हणजे लोकमानस हे केवळ राजकीय नेते-कार्यकर्त्यांच्या दाव्यांवरून ठरत नाही, सभांच्या गर्दीवरून समजत नाही की जाहिरातींच्या मार्यानं निश्चित होत नाही. ते वेगळंच असतं. लोकमानस मूक असतं, ते जाणावं लागतं. त्याचा अंधुक अंदाज यायला लागतो तो अगदी खालच्या आर्थिक स्तरापासून ते अगदी वरच्या आर्थिक स्तरापर्यंतच्या माणसांनी सहज व्यक्त केलेल्या मतांवरनं. कोणत्याही शहराच्या दाट वस्तीतल्या छोट्या टपरीवजा हॉटेलमध्ये चहाची ऑर्डर देऊन बसलं अन तिथं कोंडाळं करून पाव-सँपल खाणार्या टोळक्याच्या गप्पांकडं कान दिला की ते हळूहळू पाझरतं. मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं एकत्र आलेल्यांच्या रंगलेल्या चर्चेतून ते उलगडतं. मंडईत भाजीचे भाव विचारणारी गृहिणी, रिक्षा चालवणारा व्यावसायिक यांच्याकडून ते अलगद काढून घेता येतं.
लोकमानस नेमकं कुठं जाईल... हे आता हळूहळू निश्चित होऊ लागलंय. निवडणूक जाहीर झाली तेव्हा असलेलं लोकमानस हळूहळू बदलत चाललंय. आख्खी निवडणूक फिरवणारा एखादा मुद्दा किंवा घटना घडली नाही तर मतदानाच्या दिवशी ते लोकमानस दुसर्या टोकाला उभं राहील. फिरा... अंदाज घ्या... तुम्हालाही ते समजेल...