पुणे : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेत महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाराज कृष्णकुमार सिंहजी भावनगर गुजरात या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाने व्हिएनएस गुजरात युनिव्हर्सिटी संघाचा ७-० असा सहज पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संघाने युनिव्हर्सिटी ऑफ कोटा संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाने महाराज सुरजमल ब्रीज विद्यापीठ भरतपूर संघाचा १३-० असा एकतर्फी पराभव केला.
महाराज कृष्णकुमार सिंहजी भावनगर गुजरात संघाने मोहनलाल सुखाडीया विद्यापीठ उदयपूर संघाचा २०-० असा धुव्वा उडविला. सामन्यात प्राची शहाने सर्वाधिक आठ गोल नोंदविले. संत घाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघाने गायत्री अंबोरे आणि भैरवी मोहुर्ले यांनी केलेल्या गोलांमुळे बराकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ संघाचा २-१ असा सहज पराभव केला.