Pune Khadakwasla Dam release due to Heavy Rain
पुणे : पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून, शहरातील अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचू लागले आहे. दुसरीकडे घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
'खडकवासला'मधून काही वेळातच २ हजार 'क्युसेक्स' विसर्ग
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील 24 तासांत खडकवासला धरणात 18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी दीडच्या सुमारास धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. २ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून यंदाचा मोसमात धरणणातून प्रथम पाण्याचा विसर्ग झाला. स्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये 5.25 टीएमसी पाणीसाठा असून, हा पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत 1.35 टीएमसी इतका अधिक आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने नदीकाठ परिसरातील वाहने आणि जनावर सुरक्षित स्थळी नेण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वी सायरन वाजला
पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वी नदीपात्रात सायरन वाजवत अलर्ट देण्यात आला. महापालिकेकडून नदीपात्रांमध्ये सायरन बसवण्यात आले असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वी नागरिकांना याबाबत सूचना मिळावी म्हणून सायरनद्वारे इशारा दिला जातो.
भिडे पुलावरील वाहतूक बंद
शहरात दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. पुण्यातील भिडे पुलाच्या काठोकाठ पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. खडकवासला धरणात परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर भिडे पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम
मागील ४८ तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. तसेच मुंबईतही रविवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. आज (१६ जून) सकाळपासूनच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची नोंद झाली आहे. वसई-विरार भागात रविवारीपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.