सासवड : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्याचा दि. 22 व 23 जून रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे मुक्काम आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील झेंडेवाडी ते जेजुरीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर लोखंडी होर्डिंग्ज उभारले गेले असून, वादळी वार्यांमुळे हे फलक अपघातास आमंत्रण देत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालक व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शिवरी, खळद, निरा शिवतक्रार, चांबळी, बोपगाव, बेलसर, पूरपोखर, भिवडी, झेंडेवाडी, दिवे, साकुर्डे, पिपरे खुर्द, हिवरे, केतकावळे, देवडी, जवळार्जुन, माळशिरस, वाघापूर या गावांत अनेक राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे सरकारी गायरान, रस्ते बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत मालकीच्या जागेत हे सर्व होर्डिंग्ज बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे उभारले असल्याचे समोर आले आहे.
दिवेघाटानंतर झेंडेवाडी ते जेजुरीपर्यंत भलेमोठे होर्डिंग्ज रस्त्याला लागून आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरू असून अनेकदा वादळी वारेही सुटत आहे. त्यामुळे बहुतांश होर्डिंग्जवरील जाहिरातीचे कागद फाटत असून ते फडफडत आहेत. तर काही ठिकाणचे कागद हे उडून रस्त्यावर पडत आहेत, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत प्रशासन जबाबदारी घेत नसल्याचे चित्र आहे.
पुरंदर पंचायत समिती प्रशासनाने सर्व होर्डिंग्ज जमीनदोस्त करण्याऐवजी ग्रामपंचायतीमार्फत नोटीस पाठवून स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मुळातच एकही होर्डिंग्ज अधिकृत नसताना त्याचे स्ट्रॅक्चरल ऑडिट कसे करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्दैवी दुर्घटना घडली. या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक जाहिरात फलकांचे येत्या 7 दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा. परिक्षणात धोकादायक असलेले जाहिरात फलक काढून घ्यावेत. कार्यवाही करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.